कणकवली : आपल्या गुरुंकडून मिळालेल्या कलेचा सातत्याने रियाज करणे, गुरूवर निष्ठा ठेवणे आणि वेळोवेळी प्रायोगिकतेवर भर दिल्याने कलाकारांची कला वृध्दिंगत होते. गुणवंत कलाकार यामुळेच खऱ्या अर्थाने घडत असतो, असे मत शास्त्रीय संगीत गायिका धनश्री फडके- नाखे यांनी व्यक्त केले.कणकवलीतील गंधर्व फाऊंडेशनच्या माध्यमातून गंधर्व शास्त्रीय संगीत सभा दर महिन्याला आयोजित करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून आशिये श्री दत्त क्षेत्र येथे धनश्री फड़के- नाखे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमा दरम्यान कलाकार व्यक्तिगत आयुष्यात त्यांची कला कशी जोपासतो? त्याचे कलाविषयक विचार समजून घेण्यासाठी प्रसाद घाणेकर यांनी धनश्री फड़के- नाखे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.धनश्री फड़के- नाखे यांनी आपल्या एकंदर गायन कला कारकिर्दीचा प्रवास यावेळी संगीत रसिकांसमोर उलगड़ला. जयपूर अत्रौली घराण्याच्या विदुषी पद्मा तळवलकर यांच्या शिष्य असलेल्या धनश्री या संगीत विशारद आहेत . त्यांनी गायन या विषयातून एम .ए. हि पदवी संपादन केली आहे.त्यांना अनेक पारितोषिके , शिष्यवृत्ती व पुरस्कार आजपर्यंत मिळाले आहेत . महाराष्ट्रातील अनेक शहरात त्यांच्या गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. याबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली.त्यानंतर धनश्री फड़के यांचे गायन झाले. ऐन गणेशोत्सवात रंगलेल्या या मैफिलीला दर्दी संगीत रसिकांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली. या गंधर्व संगीत सभेच्या सुरुवातीला धनश्री फडके यांनी 'भीमपलास ' या रागातील बडा ख्याल व छोटा ख्याल गायला .त्यानंतर त्यांनी 'केदार ' रागातील दोन बंदिशी सादर केल्या .
केदार रागानंतर त्यांनी 'कलावती' रागातील बंदिश गाऊन रसिकांची वाहवा मिळवली. यानंतर 'भाटियार ' रागातील 'पांडुरंग नामी' हा अभंग, 'हंसध्वनी' रागातील एक अभंग व शेवटी 'जोहर मायबाप जोहर' या नाट्यपदाने या सांगितिक कार्यक्रमाची सांगता केली . धनश्री फड़के यांना हार्मोनियम साथ मधुकर लेले व तबला साथ हेरंब जोगळेकर या रत्नागिरीतील कलाकारांनी केली .या गंधर्व मासिक सभेसाठी आसमंत रत्नागिरी या संस्थेचे नंदू पटवर्धन यांनी विशेष सहकार्य केले होते . हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष सुतार ,किशोर सोगम, मनोज मेस्त्री, श्याम सावंत,सागर महाडिक, विलास खानोलकर, अभय खडपकर , दामोदर खानोलकर,दिनेश गोगटे,सुरजित ढवण यांनी विशेष मेहनत घेतली.21 ऑक्टोबर रोजी पुढील संगीत सभा !यापुढील २२वी गंधर्व शास्त्रीय संगीत सभा २१ ऑक्टोबर रोजी आशिये येथे होणार आहे. डोंबिवली येथील समीर अभ्यंकर यावेळी सुमधुर गायन सादर करणार आहेत . या मैफिलीला उपस्थित राहून शास्त्रोक्त संगीताचा आस्वाद रसिकानी घ्यावा असे आवाहन गंधर्व फाउंडेशनच्यावतीने यावेळी करण्यात आले. आशिये येथे गंधर्व संगीत सभेत धनश्री फड़के- नाखे यांनी सुमधुर गीते सादर केली.