कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी मुंबई , पुणे तसेच जिल्ह्याबाहेरुन अनेक भाविक दाखल होत असतात. ते विविध वाहनातून मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करतात. त्याना त्रास होऊ नये तसेच त्यांचा प्रवास निर्धोक व्हावा यासाठी तातडीने प्रयत्न करा अशी सक्त सुचना खासदार विनायक राऊत यांनी राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता बनगोसावी तसेच महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.कलमठ ते खारेपाटण दरम्यान राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाली असून या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची पहाणी खासदार विनायक राऊत यांनी केली.यावेळी शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर , कणकवली विधानसभा मतदार संघ प्रमुख शैलेश भोगले, तालुकाप्रमुख सचिन सावंत, मंगेश लोके, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, युवा सेना जिल्हाप्रमुख अड़. हर्षद गावडे, राजू राठोड , सोमा घाडिगावकर , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता बनगोसावी तसेच केसीसी बिल्डकॉन कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
त्यामुळे प्रवासी आणि वाहनचालकाना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसेच दररोज अपघात घडत आहेत. अशा अनेक तक्रारी खासदार विनायक राऊत यांच्याकडे आल्या होत्या. त्याची दखल घेत त्यांनी सोमवारी महामार्गाची प्रत्यक्ष पहाणी केली. तसेच काही सुचनाही केल्या.यावेळी अधिकारी तसेच ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेत अनेक मुद्दे समोर आले. केसीसी बिल्डकॉन कंपनीकड़े सिंधुदूर्गातील 38 किलोमीटर लांब महामार्ग चौपदरिकरणाचे काम आहे. त्यापैकी 8 किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. पाऊस असल्यामुळे पुढील काम करणे अडचणीचे ठरत आहे. सप्टेंबर मध्ये पुढील काम सुरु करण्यात येईल असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.महामार्ग चौपदरिकरणाअंतर्गत केलेल्या कामात काही अडचणी निर्माण झाल्यास त्या दूर करण्यासाठी चौवीस तास कार्यरत असलेले पेट्रोलिंग यूनिट तैनात ठेवण्यात आले आहे. त्यांचे संपर्क क्रमांक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत.
महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्यात येत आहेत. मात्र, पावसामुळे या कामात अडचणी निर्माण होत आहेत. हॉटमिक्सने हे खड्डे बुजविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी बनविलेला रस्ता खचला आहे. रस्त्याचा तो भाग तोडून तेथील काम पुन्हा केले जाणार आहे. असेही यावेळी सांगण्यात आले.महामार्गावरील पुलांच्या ठिकाणी सध्या पावसाच्या दिवसात रात्रीच्या वेळी वाहनचालकाना मार्गदर्शन व सुचना करण्यासाठी रिफ्लेक्टर जॅकेट घातलेले कर्मचारी नियुक्त करण्यात येतील असे बनगोसावी यांनी सांगितले.कणकवली शहरालगत गडनदी पुलावर पाणी साचत आहे. त्याचा निचरा होण्यासाठी तत्काळ प्रयत्न करावेत असे खासदार राऊत यांनी सांगितले. तसेच महामार्गावरील 14 पुलांची कामे करायची असून नवीन ठेकेदाराला जून महिन्यात कार्यारंभ आदेश मिळाल्यामुळे तसेच पाऊस सुरु झाल्यामुळे त्याना काम सुरु करता आलेले नाही. असेही ते यावेळी म्हणाले.दोन गुणांक राज्य शासनाचा विषय !कणकवली शहरातील महामार्गासाठी जमीन जाणाऱ्या मालकाना मोबदला देताना दोन गुणांक देण्याचा निर्णय राज्य शासनाने घ्यायचा आहे. आमचा पाठपुरावा सुरु आहे मात्र शासनाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे खासदार विनायक राऊत यानी यावेळी सांगितले.नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करु !महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने आपल्या यंत्र सामुग्रीचा विमा उतरविला आहे. त्यामुळे काही दुर्घटना घडल्यास त्याना नुकसान भरपाई मिळेल. त्याचप्रमाणे हे काम सुरु असताना एखाद्या वाहनाचा अपघात झाल्यास व एखादी व्यक्ति दगावल्यास त्याच्या कुटूंबियाना नुकसान भरपाई मिळावी यासाठी निश्च्तिच प्रयत्न करण्यात येतील.असे खासदार विनायक राऊत यानी सांगितले.