सिंधुदुर्ग : अलीकडील तरूण मालवणी बोलीभाषेचे संवर्धन करतीलच. मच्छिंद्र कांबळी, दूरदर्शन कलाकार वैभव मांगले आदी कलाकारांनी मालवणी भाषेची चांगली प्रसिद्धी केलेली आहे. पण या मालवणी बोली भाषेला राजाश्रय मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन मालवणी बोली भाषा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी केले.मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्र सिंधुदुर्गने सिंधुभूमी कला अकादमी सिंधुदुर्गच्यावतीने येथील आचरेकर प्रतिष्ठानमध्ये पाचवे मालवणी बोली साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी संमेलनाध्यक्ष महेश केळुसकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, विश्वास मेहेंदळे उपस्थित होते.संदेश पारकर यांनी मालवणी बोली भाषा महाराष्ट्राच्या नकाशावर आली पाहिजे. या भाषेत प्रेम व आपुलकी आहे. या भाषेमुळे गोडवा निर्माण होतो. या भाषेमुळे सिंधुदुर्गातील ज्वलंतपणा दिसला, असे त्यांनी सांगितले.गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांनी कार्यक्रमास आलेल्या व्यक्तींवर लिहिलेल्या चारोळ्या म्हणून दाखविल्या. यावेळी ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर, प्रा. नामदेव गवळी, अजय कांडर, कवयित्री सुनंदा कांबळी, मधुसूदन नानिवडेकर यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विलास खानोलकर यांनी केले.कला क्षेत्राबाबत प्रशिक्षण वर्ग सुरू करूसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, मालवणी बोलीचे जतन करणे आवश्यक आहे. साहित्य व कला क्षेत्रात सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी एखादे प्रशिक्षण सुरू करता येईल का याचा विचारविनिमय आम्ही करू. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू हेसुद्धा सिंधुदुर्गातीलच आहेत. त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कला क्षेत्राबाबत प्रशिक्षण वर्ग सुरू करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रमोद जठार यांनी यावेळी मुंबईत असतानाचे आपले अनुभव सांगितले. मुंबईतून आल्यानंतर आपण मालवणीतच बोलत असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. मुंबईत जरी शिक्षण झाले असले तरी मालवणी भाषेवरचे प्रेम कमी झालेले नाही, असेही ते म्हणाले.