तळवडे : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव-वेत्ये गावांच्या सीमेवर सुमारे ३८ एकर जागेतील आंबा, काजू बागेला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांनी केले पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. हाताशी आलेले उत्पन्न या आगरुपी संकटाने हिसकावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या शेतजमिनी, माळरानांवर अग्नीतांडव निर्माण होत असून यात आंबा, काजू बागायतींचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. हाता-तोंडाशी आलेली आंबा, काजू बागायती जळून खाक होत आहे. याची नुकसान भरपाई देणार कोण? असा सवाल केला जात आहे.
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव-वेत्ये परिसरातील सुमारे तीन एकरच्या परिसरात गुरुवारी आगडोंब उसळला. यात आठ ते दहा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या अग्नितांडवात एक हजारच्यावर आंबा, काजू कलमे जळून खाक झाली. या घटनेचा अजूनही पंचनामा न झाल्याने नुकसानीचा नेमका आकडा उपलब्ध झाला नाही.गोरगरीब शेतकऱ्यांनी दिवस-रात्र घाम गाळून फुलविलेल्या आंबा, काजू बागा ऐन हंगामातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. आग कोणी लावली की अन्य कोणत्या कारणाने लागली याचा शोध घेणे गरजचे आहे. तशी मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे.दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बागायतींना आग लागण्याचे प्रकार वाढले असून हे वेळीच थांबणे गरजेचे आहे. सावंतवाडी तालुक्यातील ओवळिये गावातही असाच प्रकार घडला. बांदा, वेंगुर्ले परिसरातही अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत.
शासनाने अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन मदतीचा हात देणे गरजेचे आहे. आम्ही शेतकºयांनी गेली २५ वर्षे उन्हातान्हात राबून आंबा, काजूच्या बागा फुलविल्या. मात्र आज उत्पन्न घेण्याची वेळ आली असतानाच आमच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. शासनाने आम्हांला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी दिलीप राऊळ यांनी केली आहे.आग लागून आंबा, काजू बागायतीचे जे नुकसान होते, त्याची नुकसान भरपाई शासनाने द्यावी. ग्रामीण भागातील शेतकरी कष्ट करून बागायती करतात, पण ऐन उत्पन्नाच्यावेळीच असे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी काय करावे? असे विचारले असता अशावेळी शासनाने शेतकऱ्यांसाठी तारणहार बनावे, असे शेतकरी गंगाराम राऊळ यांनी सांगितले.
शासन नुकसान भरपाई देईल का?; मळगावातील शेतकऱ्यांवर संकट२० ते २५ वर्षे उत्पन्न देणारी आंबा, काजू कलमे जळून खाक झाल्याने गरीब शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. याची दखल घेऊन शासन नुकसान भरपाई देईल का? की केवळ आश्वासने देणार? असा सवाल शेतकऱ्यांतून केला जात आहे.