सिंधुदुर्ग : ज्येष्ठ मालवणी साहित्यिक अरविंद म्हापणकर हे एक चिरतरुण लेखक असून मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांचे पाठ्यपुस्तक सामावून घेण्याबाबत कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची भेट घेण्यात येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले.मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे ज्येष्ठ मालवणी साहित्यिक अरविंद म्हापणकर यांच्या तीन मालवणी कथासंग्रहांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्याचे आयोजन अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद शाखा मालवण, फेस्कॉम संलग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघ मालवण आणि म्हापणकर परिवार व मित्रमंडळ यांच्यावतीने करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर अरविंद म्हापणकर, अनुपमा म्हापणकर, साहित्यिका वैशाली पंडीत, कोमसापचे मालवण तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर, सुहास चिंदरकर, रविकांत अणावकर, ज्येष्ठ नागरिक संघ मालवणचे अध्यक्ष डॉ. सुभाष दिघे, रवींद्र वराडकर, संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.मालवणी बोलीभाषेला साहित्य रूपातून गतवैभव प्राप्त करून देण्यात ज्येष्ठ साहित्यिक अरविंद म्हापणकर यांचे मोठे योगदान आहे, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी काढले.
पुणे-मुंबईच्या मोठ्या साहित्यिकांना टक्कर देत म्हापणकर यांनी वयाच्या ८० व्या वर्षी एकाच वेळी लिहिलेली तीन पुस्तके प्रकाशित करण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. अरविंद म्हापणकर यांनी लिहिलेल्या हसगुल्ले, पटला तर घेवा, रंगभूमीची ऐशी की तैशी या तीन मालवणी कथासंग्रहांचे प्रकाशन मधु मंगेश कर्णिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सुरेश ठाकूर, वैशाली पंडित आणि रवींद्र्र वराडकर यांनी म्हापणकर यांच्या तिन्ही पुस्तकांबद्दल विवेचन केले. यावेळी मधु मंगेश कर्णिक यांचा अरविंद म्हापणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर समुह नृत्य, विनोदी एकपात्री, मालवणी दशावतार झलक, मालवणी कविता आदी सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुविधा कासले व संजय शिंदे यांनी केले. यावेळी नाट्य परिषदेचे कार्यकर्ते, फेस्कॉम संलग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे सदस्य, तसेच म्हापणकर परिवार यांच्यासह साहित्य प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.मालवणी बोलीवरील प्रेमामुळेच मालवणी लिखाण!अरविंद म्हापणकर म्हणाले, मालवणी बोलीवरील प्रेमामुळेच आपण मालवणी बोलीच्या विकासासाठी जे शक्य होते ते केले आहे. आपण वयाच्या उत्तरार्धात झुकलो असून आज प्रकाशित झालेली तिन्ही पुस्तके यापूर्वीच प्रकाशित झाली असती तर आपल्याला अधिक आनंद झाला असता. आपल्या या प्रवासात मधु मंगेश कर्णिक व माझ्या इतर सहकाऱ्यांची मोठी साथ व सहकार्य लाभले. कर्णिक यांच्या हस्ते माझ्या पुस्तकांचे प्रकाशन होणे हे माझे भाग्य आहे असे भावोद्गार यावेळी म्हापणकर यांनी काढले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही विचार मांडताना वयाच्या ८० व्या वर्षातही लिखाण सुरू ठेवत एकाच वेळी तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्याचा योग साधणाऱ्या म्हापणकर यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला.
तसेच यावेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, वृत्त निवेदिका मनाली दीक्षित, अभिनेते दिलीप प्रभावळकर, संजय नार्वेकर, विकास कदम, सुनील बर्वे, मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या म्हापणकर यांना शुभेच्छा देणाऱ्या चित्रफितीही दाखविण्यात आल्या.