सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह््यात गोकुळकडून २०१३ पासून सुरू असलेले गायीचे दूध संकलन अचानक बंद केल्याने कर्जदार शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
गोकुळच्या या निर्णयाचा जाहीर निषेध करतो. गोकुळने बंद केलेले गायीचे दूध संकलन पुन्हा सुरु करावे. येथील दुग्ध व्यवसायायिक शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दूर व्हावा, गोवा राज्याप्रमाणे दुधाला दर व अनुदान मिळावे, दूध उत्पादकांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी २७ जून रोजी सकाळी दहा वाजता ओरोस येथील श्री देव रवळनाथला येथे दुधाचा अभिषेक करून उर्वरित दुधाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध वाटप आंदोलन छेडून राज्य सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाच्या असहकार्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे पाच हजार लिटर गायीचे दूध वाया जात असून दररोज हजारो रूपयांचे नुकसान होत आहे. गायीचे दूध उचल करण्यास गोकुळ दूध संघाने आता नकार दिला असून दूध उत्पादक शेतकरी आणि दुग्ध विकास संस्था अडचणीत आल्या आहेत.
याबाबत पुढील निर्णय घेण्यासाठी जिल्हा बँकेच्या सभागृहात अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. यावेळी मनिष दळवी, सुगंधा साटम, नारायण गावडे, अरविंद देसाई, विष्णू सावंत, तानाजी नाईक यांच्यासह जिल्ह्यातील ८० दूध उत्पादन व्यावसायिक व शेतकरी उपस्थित होते.गोकुळ दूध उत्पादक संघाने कोल्हापूर जिल्हा वगळता सिंधुदुर्ग व लगतच्या जिल्ह्यांमधील गायीचे दूध संकलन करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गायीचे दूध उत्पादन करणारे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत.२५ ला नियोजन सभासरकारला जाग आणण्यासाठी २७ रोजी आंदोलन छेडले जाणार आहे. ओरोस येथील रवळनाथ मंदिरात दुधाचा अभिषेक करून उर्वरित दूध जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वाटप करण्यात येणार आहे. या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी २५ रोजी दुपारी बारा वाजता जिल्हा बॅकेत या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
हे आंदोलन नि:पक्ष असून यात सर्व पक्षातील नेते,कार्यकर्ते, शेतकरी, दूध उत्पादक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सतीश सावंत यांनी केले आहे.