मालवण : मालवण शहराच्या प्रवेशद्वारावरील कुंभारमाठ जरीमरी रस्ता दुरुस्तीप्रश्नी मनसे पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी एका रात्रीत रस्ता व बाथरूमच्या सोयीसुविधा केल्या जातात. मग या धोकादायक बनलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीला आठ महिने का लागतात? याठिकाणी मोठ्या अपघाताची वाट पाहता काय? असा सवाल मनविसे जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी केला.दरम्यान, खचलेला रस्ता ७ दिवसांत दुरुस्त न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने या मार्गावर रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी दिला. मनसे पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत जाब विचारला.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, शैलेश अंधारी, गणेश वाईरकर, अमित चव्हाण, शैलेश चव्हाण, विल्सन गिरकर आदी उपस्थित होते.पावसाळ्यात कुंभारमाठ जरीमरी उतारावरील रस्त्याचा संरक्षक कठडा कोसळून हा रस्ता धोकादायक बनला आहे. या घटनेला आठ महिने झाले तरी सुस्तावलेल्या बांधकाम विभागाने या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष केले आहे.
या धोकादायक रस्त्याच्या ठिकाणी तातडीने रस्ता दुरुस्ती करणे आवश्यक असताना बांधकाम विभागाने पर्यायी व्यवस्था केली. मात्र ही पर्यायी व्यवस्था जणू मृत्यूचा सापळा ठरत आहे. येत्या सात दिवसांत या रस्त्याचे काम करण्यात यावे असा आक्रमक पवित्रा मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतला.बांधकाम विभागाचे अभियंता प्रदीप पाटील यांनी या रस्त्याच्या कामासाठी महिन्याची मुदत मागितली. मात्र आक्रमक झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी सात दिवसांत कामाला सुरुवात न झाल्यास रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.