सिंधुदुर्ग : दूरसंचारची सतत खंडित होणारी सेवा व क्रॉस कनेक्शनमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. लवकरात लवकर सेवा सुरळीत करावी. अन्यथा कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पदाधिकाऱ्यांनी दूरसंचारच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.नागरिकांसोबत मालवण दूरसंचार कार्यालयावर धडक दिलेल्या नगरसेवक यतीन खोत व स्वाभिमान पदाधिकाऱ्यानी अधिकाऱ्यांना खेळण्यातील मोबाईल भेट दिले. तुमच्या सेवेचा बोजवारा उडल्यामुळे ग्राहकांचे मोबाईल खेळण्यातील असल्यासारखे झाले आहेत. त्यामुळे तुम्हीही खेळण्यातील मोबाईल घ्या असे खोत यांनी सांगितले.
यावेळी स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष बाळू कोळंबकर, लोकसभा मतदार संघ उपाध्यक्ष बाबा परब, नगरसेवक यतीन खोत यांच्यासह चारुशीला आढाव, शिल्पा खोत, हिमानी गायकवाड, वैभव वळंजू, प्रकाश करंगुटकर, राजू आचरेकर, रुजाय फर्नाडिस, कुशल आचरेकर, अनिकेत आचरेकर, विलास मुणगेकर, अमु हर्डीकर, आनंद वारंग व अन्य नागरिक उपस्थित होते.खासगी कंपनीच्या सेवा सुरळीत असताना दूरसंचारची सेवा वारंवार का कोलमडत असते. या कंपन्याशी दूरसंचारचे सेटिंग आहे का? असा सवाल बाळू कोळंबकर व बाबा परब यांनी यावेळी उपस्थित करत चार दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मालवणात बोलवा अशी मागणी केली. यावेळी अधिकाऱ्यांचेच वरिष्ठांना फोन लागत नसल्याचे वास्तव समोर आले.केवळ आश्वासनदूरसंचार अधिकारी कसबे यांनी दूरसंचार सेवेचे नूतनीकरण सुरू असल्याने काही समस्या निर्माण झाल्या. मात्र त्या लवकरात लवकर दूर करत सेवा सुरळीत केली जाईल असे स्पष्ट केले. मात्र नेमकी केव्हा सेवा सुरळीत होईल याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नसल्याने नागरिक अधिकच आक्रमक बनले. अखेर अधिकाऱ्यांनी चार दिवसांत वरिष्ठ अधिकाºयांना मालवणात बोलावू असे स्पष्ट केले.