सावंतवाडी : गिरणी कामगार व वारसांना घरे देण्यास सरकार टाळाटाळ करत असून घरांची लॉटरी खुली करण्यात येत नसल्याने महाराष्ट्र दिनी १ मे रोजी गिरणी कामगार व वारस सावंतवाडीत धरणे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघाचे अध्यक्ष दिनकर मसगे यांनी सांगितले.गेल्या तीन वर्षात सरकारने गिरणी कामगारांना घरे देण्यास टाळाटाळ केली. घरांची सोडत काढली त्यांनतर गिरणी कामगार व वारसांनी अर्ज केले. पण ही सोडत अद्यापही जाहीर केली नाही. त्यामुळे राज्यभरातील गिरणी कामगार व वारस नाराज आहेत. आम्ही याबाबत मुंबईत आझाद मैदानावर आंदोलने केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आश्वासनही दिले, असे बैठकीत मसगे म्हणाले.पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत दिनकर मसगे यांनी उपस्थित गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना घरे, पेन्शन, पीएफ आदीबाबत माहिती दिली.
यावेळी श्यामसुंदर कुंभार, राजेंद्र पडते, सुभाष परब, अभिमन्यू लोंढे, सुनील नाईक, सविता आरोलकर, सरस्वती कवठणकर, सत्यवती मुळीक, सुषमा धाऊसकर, प्राची भोगले, शोभा पंडीत, लक्ष्मी सांगेलकर, रवीना नाईक, गुणाजी सावंत, आत्माराम नाईक, जनार्दन मुळीक, यशवंत महाले, भीवा परब, शिवराम माधव, गुरूनाथ राऊळ, सुभाष नाईक आदी गिरणी कामगार व त्यांचे वारस उपस्थित होते.शासनाचे लक्ष वेधणारमहाराष्ट्र गिरणी कामगार व वारसांचे १ मे रोजी आंदोलन होईल. आपण मुंबईत जायचे नाही तर जिल्ह्याचे आंदोलन सावंतवाडीत करूया तसेच त्या दिवशी सकाळी दहा वाजता प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडून आपल्या मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधूया, असे मसगे यांनी सांगितले.