कुडाळ : महामार्गावर तेर्सेबांबडे-मळावाडी येथे बॉक्सवेल बांधावा, या मागणीसाठी तेर्सेबांबर्डे, मांडकुली व भोयाचे केरवडे येथील सरपंच, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी मंगळवारी ठिय्या आंदोलन केले.
महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश शेडेकर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, १० मे पर्यंत मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.कुडाळ तालुक्यात मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महामार्गाच्या पलीकडे शेतकऱ्यांची शेती, नदीवर पाण्यासाठी जाणाऱ्या गुरांचा मार्ग, स्मशानभूमी असल्यामुळे मांडकुली, भोयाचे केरवडे या दोन गावांना जोडणारा तेर्सेबांबडे-मळावाडी येथे बॉक्सवेल बांधण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले.या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना या तिन्ही गावांच्या ग्रामपंचायतींमार्फत निवेदनेही देण्यात आली होती. मात्र, जिल्हाधिकारी प्रशासनाने यावर केवळ ग्रामस्थांच्यादृष्टीने समाधानकारक कार्यवाही करावी, असा शेरा मारून महामार्ग विभागाला पत्र देण्याचीच कार्यवाही केली. त्यामुळे तीनही गावातील संतप्त ग्रामस्थांनी अखेर रस्त्यावर उतरत प्रस्तावित मागणीच्या ठिकाणीच लाक्षणिक ठिय्या आंदोलन छेडले.महामार्ग विभागाचे उपकार्यकारी अभियंता शेडेकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. महामार्ग चौपदरीकरण कामाचा आराखडा पूर्णत: तयार झाला असून त्यात कोणताही बदल करायचा झाल्यास त्याचा वाढीव खर्च व वाढणारा वेळ याचा प्रशासन स्तरावरून गांभीर्याने विचार केला जातो.
यासाठी तांत्रिक मंजुरीसाठी एक समिती काम करते. त्यामुळे ग्रामस्थांच्या या मागणीचा विचार करून आपण तसा प्रस्ताव आपल्या कार्यालयात तयार करून तो वरिष्ठांकडे पाठवू. यासंदर्भात आपण काय कार्यवाही करणार आहात, याचे लेखी उत्तर तत्काळ बुधवारपर्यंत तिन्ही ग्रामपंचायतींना पाठविले जाईल. मात्र तोपर्यंत नियमानुसार व टेंडरनुसार काम करू द्या, असे त्यांनी सांगितले.जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्याशी महामार्ग प्रकल्पग्रस्तांची भेट निश्चित केली आहे. ग्रामस्थांनी आपले म्हणणे सादर करावे, असे सूचित केले. ग्रामस्थांनी या सर्व मागण्यांच्या पूर्ततेसाठी १० मे ची मुदत दिली आहे. अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
या आंदोलनात तेर्सेबांबर्डे सरपंच संतोष डिचोलकर, मांडकुली सरपंच तुषार सामंत, रुपेश कानडे, दिलीप निचम, अजय डिचोलकर, बाबुराव सावंत, गुणाजी जाधव, सागर कोरगावकर, सूर्यकांत कानडे, मधुकर दळवी, गुरूनाथ मराठे, केशव राणे, नयना कोरगावकर, भागिरथी कानडे, सुप्रिया कानडे, संजय डिचोलकर यांनी सहभाग घेतला. माजी उपसभापती बबन भोगटे, पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक, स्वाभिमानचे कुडाळ तालुकाध्यक्ष दीपक नारकर, दिनेश साळगावकर, सचिन धुरी, समीर हळदणकर यांनी यावेळी भेट दिली....तर महामार्गावरच प्रतीकात्मक चिताआमच्या मागण्या प्रशासनाच्या कानी जात नसतील, तर झाराप येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ढोल बडवत जावे लागेल, अशा भावना व्यक्त करतानाच यापुढे महामार्गावर अपघातात एकाचा जरी मृत्यू झाला, तर महामार्गावरच प्रतीकात्मक चिता रचून तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.