कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणातर्गत कणकवली तालुक्यातील 22 महसुली गावातील प्रकल्पग्रस्तांचा मोबदला वाटपाचे काम गतीने सुरु आहे. 22 गावातील 9 हजार खातेदारांपैकी 7 हजार 800 खातेदारांच्या बँक खात्यात 375 कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत.
तालुक्यात 80 टक्के मोबदला वाटपाचे काम पूर्ण झाले आहे. तर कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांना 15 कोटी रूपये मोबदला वाटप झाला असल्याची माहिती प्रांताधिकारी निता सावंत-शिंदे यांनी दिली.मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्पग्रस्तांकडून जमिनी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्याचा मोबदला देण्याची प्रक्रीया गतीने प्रशासकीय पातळीवर करण्यात येत आहे. कणकवली तालुक्यात 22 महसुली गावांमध्ये महामार्ग चौपदरिकरण बाधीत प्रकल्पग्रस्त आहेत.महामार्गासाठी जमिन जात असलेल्यांमध्ये 9 हजार खातेदार आहेत. भूसंपादन प्रक्रीया पूर्ण होत आली असून 9 हजार खातेदारांपैकी सुमारे 7800 खातेदारांच्या खात्यावर एनईएफटी द्वारे पैसे जमा करण्यात आले आहेत. 80 टक्के मोबदला वाटपाचे काम पूर्ण झाल्याचे निता सावंत-शिंदे यांनी सांगितले.या जमीनी संदर्भात काही निवाड्यांमध्ये आलेल्या तक्रारींवर सुनावण्या सुरू आहेत. खातेदारांमध्ये तडजोडी होत असून उर्वरित 20 टक्यांचे वाटप लवकरच करण्यात येणार आहे. कणकवली शहरात महामार्ग बाधीत 476 खातेदार असून त्यांना 44 कोटींचा मोबदला मंजूर झाला आहे. त्यापैकी 15 कोटींचे वाटप खातेदारांना करण्यात आले आहे.कणकवली शहरातील सरासरी 32 टक्के प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यात आला आहे.शहरातील प्रकल्प बाधिताना 29 कोटी रूपये वाटपाची प्रक्रीया सुरू आहे. तर सुमारे 150 खातेदारांना मोबदला देण्यात आल्याचे प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी सांगितले.