चौके : स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग दर्शविण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी समाजप्रबोधन करण्यासाठी मुंबई येथील आयकर अधिकारी संजय सावंत व त्यांचे मित्र ललित आकुटकर हे दोघेजण मुंबई ते कन्याकुमारी हा १७६० किमीचा प्रवास सायकलवरून करत आहेत.
९ डिसेंबर रोजी मुंबई येथून त्यांनी आपल्या प्रवासाची सुरूवात केली. बुधवार सायंकाळी त्यांचे कुडाळ येथे आगमन झाले. त्या रात्री सावंत आणि त्यांचे सहकारी आकुटकर यांनी कुडाळ येथे वास्तव केले.
कुडाळमधील संत राऊळ महाराज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी मार्गदर्शन केले. प्लास्टिकचा वापर टाळण्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले.मुंबई ते कन्याकुमारी सायकल प्रवासादरम्यान मार्गातील महत्त्वाच्या शहरांमध्ये थांबून येथील शाळा, महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना पत्रके वाटून आणि मार्गदर्शन करून स्वच्छ भारत अभियानाचा प्रसार करणार असल्याचे संजय सावंत यांनी सांगितले.
प्लास्टिकच्या पिशव्या व बाटल्यांचा वापर टाळला पाहिजे. तरच आपला परीसर स्वच्छ व हिरवागार ठेवता येईल. येणाऱ्या नवीन पिढीला प्रदुषण विरहीत वातावरण देणे ही आपलीच जबाबदारी आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर दोघांनी गोव्याच्या दिशेने मार्गक्रमण केले. त्यापैकी ललित आकुटकर हे मुंबई ते कोचीपर्यंत सायकल प्रवास करणार असून पुढील प्रवास संजय सावंत एकटेच करणार आहेत. त्यांच्या या सायकल प्रवासाला संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापकांनी शुभेच्छा दिल्या.पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी करासंत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजय सावंत यांनी सांगितले की, आपल्या सभोवतालचा परिसर प्रदुषणाच्या विळख्यात सापडत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे प्रदुषित धुक्यामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या. हे सर्व कशामुळे? तर पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा व प्लास्टिकचा अतिवापर, आपले समुद्र किनारेही प्लास्टिक व पाण्यात सोडण्यात येणाऱ्या केमिकल्समुळे प्रदुषित होत आहेत.
भविष्यात आपल्याला जर आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल तसेच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पहायचे असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी करणे गरजेचे आहे.