तळवडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ, बांदा पाठोपाठ चोरट्यांनी निरवडे येथे मंगळवारी रात्री धुमाकूळ घालत रेल्वेस्थानक नजीकच्या विष्णुसृष्टी कॉलनीमधील पाच बंगले फोडले.
यात शाहिदा नाईक यांच्या बंगल्यातील २२ हजार रूपयांची रोख रक्कम चोरट्यांच्या हाती लागली, तर इतर चार बंगल्यातील चोरीचा प्रयत्न फसला. पाचही बंगले मालकांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार सायंकाळी उशिरा अज्ञाताविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान, चोरट्यांनी पोलिसांचे लक्ष विचलीत करण्यासाठी शहरी भाग सोडून आता ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविल्याचे दिसत आहे. एकाच रात्रीत पाच बंगले फोडल्याने ग्रामस्थांसह पोलिसांचीही झोप उडाली आहे.निरवडे येथे मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी पाच बंगले फोडले. सर्व बंगल्यांचे मालक बाहेर गावी व अन्य ठिकाणी राहत असल्याचा चोरट्यांनी फायदा उचलला. कॉलनीतील माधव प्रभू, सचिन नाईक, नंदिनी प्रभू, हेमंत सोनवणे, शाहिदा नाईक या पाच जणांचे बंगले फोडले.
बांदा येथील चोरीच्या प्रकारानंतर आता निरवडे येथेही चोरट्यांनी हात साफ केल्याने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. याचा शोध पोलीस कशा पद्धतीने घेतात याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. या चोरांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आता उभे आहे.विष्णुसृष्टी कॉलनीला सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे संरक्षण असूनही मोठ्या चातुर्याने चोरट्यांनी हा चोरीचा प्रयत्न केला. यात शाहिदा नाईक यांच्या बंगल्यातील कपाटात असलेली २२ हजार रूपयांची रोख रक्कम लंपास केल्याचे त्यांनी पोलीस पंचनाम्यात सांगितले.दरवाज्याच्या कड्या-कुलपे तोडून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. यासाठी कोयता व इतर लोखंडी वस्तूंचा वापर केल्याचे दिसून आले. कपाटे फोडून आतील साहित्य आणि कपडे विस्कटून टाकले होते. बंगले मालकांपैकी शाहिदा नाईक यांचे नातेवाईक निरवडे येथे दाखल झाले होते. त्यांच्या बंगल्यातील सर्व सामान, साहित्य विस्कटून टाकले होते. कुलूप तोडून बंगल्याच्या बाहेर फेकले होते.
त्या व्यक्ती कोण़?दोन दिवसांपूर्वी अज्ञात चार व्यक्ती कॉलनीच्या मुख्य दरवाजाकडे आल्या होत्या. येथे झोपण्यासाठी जागा मिळेल काय, असे त्यांनी विचारले. पण आम्ही त्यांना नकार दिला, अशी माहिती कॉलनीच्या सुरक्षा रक्षकाने दिली. या चार व्यक्ती कोण होत्या याचा पोलिसांनी शोध घेणे गरजेचे आहे.
पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे!जिल्ह्यात चोरीचे सत्र वाढत असून ग्रामस्थांसह व्यावसायिक, दुकानदारांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, मालवण आदी भागात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे. पोलीस यंत्रणेवर पालकमंत्र्यांचा वचक पाहिजे. या सर्व चोºयांचा छडा लावून चोरट्यांवर कठोर कारवाई करावी, जेणे करुन चोरीचे सत्र थांबेल.- प्रमोद गावडे,निरवडे सरपंच
पोलिसांनी गस्त वाढवावी!पोलीस यंत्रणेने योग्य तपास करून चोरट्यांना अटक करावी. चोरटे बिनधास्तपणे घरे फोडत असल्याने येथील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. चोरट्यांंना वेळीस पकडून त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच पोलिसांनी सावंतवाडी-तळवडे-वेंगुर्ले मार्गावर गस्त वाढवावी.-जयवंत शेट्ये, अध्यक्ष,विष्णुसृष्टी कॉलनी