सिंधुदुर्गनगरी : उपप्रादेशिक परिवहन मधील रखडलेल्या ब्रेक टेस्ट ट्रॅकचे काम अखेर पूर्ण झाले असून या ट्रॅकवर मंगळवारपासून वाहनांच्या ब्रेक तपासणीची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.वाहनांची ब्रेक तपासणी शासकीय जागेतच घ्यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आरटीओ कार्यालयांना देत ट्रॅक उभारणीसाठी १ नोव्हेंबर २०१७ ची मुदत दिली होती.
दरम्यानच्या कालावधीत हा ट्रॅक पूर्ण न झाल्याने येथील वाहनांची ब्रेक तपासणीची कार्यवाही थांबवून या वाहनधारकांना सोलापूर किंवा कल्याण येथील आरटीओ कार्यालयात ब्रेक टेस्ट करण्याचे निर्देश येथील आरटीओ विभागाने दिले होते.
या निर्णयामुळे सर्वच वाहन चालक-मालक संघटनांनी आक्रमक होत आंदोलन करून आम्ही पासिंगसाठी अन्य जिल्ह्यात जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पुरेसा निधी उपलब्ध असतानादेखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे हा ट्रॅक वेळेत पूर्ण झाला नसल्याची टीकाही यावेळी करण्यात आली होती. दरम्यान, वाहन चालकांची गैरसोय पाहता मुंबई उच्च न्यायालयाने १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती.
आता ब्रेक तपासणीचे काम सुरू झाले आहे. या ट्रॅकसाठी शासनाने सुमारे ६८ लाख रुपये मंजूर केले होते. लाईट व जड मोटार वाहनांची ब्रेक तपासणी याठिकाणी केली जाणार आहे. संरक्षण भिंत आणि पिचींगचे काम मात्र अर्धवट स्थितीत आहे.
ट्रॅकचे काम पूर्णन्यायालयाच्या आदेशानुसार १५ जानेवारी रोजी या २५० मीटर लांबीच्या ब्रेक टेस्ट ट्रॅकचे काम पूर्ण झाले असून मंगळवारपासून आरटीओच्या अधिकाऱ्यांनी वाहनांची ब्रेक तपासणीची कार्यवाही सुरू केली आहे.