कुडाळ : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संंस्थापक व खासदार नारायण राणे यांच्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व हॉटेल व्यावसायिकांचे मद्यविक्री व्यवसायाचे बंद असलेले परवाने सरकारने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा हॉटेल व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारी शैलेश शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नारायण राणे यांचे संसदीय ज्ञान, दबदबा व दरारा यामुळेच हा निर्णय सरकारला घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले.शिरसाट म्हणाले, न्यायालयाने महामार्गाच्या ५०० मीटर अंतरावरील मद्यविक्री परवाने दोन वर्षांपूर्वी रद्द ठरविले होते. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक हॉटेल व मद्यविक्री व्यवसाय बंदावस्थेत होते. मद्यविक्री व्यवसायाचे परवाने सरकारने पुन्हा सुरू करावेत, यासाठी संघटनेची न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती.
यासाठी भाजपाचे पदाधिकारी व या क्षेत्रातील व्यावसायिक भाई गिरकर व अन्य लोकप्रतिनिधींनीही प्रयत्न केले होते, मात्र, परवान्यांवरची बंदी उठली नव्हती. त्यामुळे हॉटेल व्यवसायासह शासनाचा महसूल बुडत होता. त्यामुळे अवैध मद्य विक्रीला ऊत आला होता. असे विविध प्रश्न निर्माण झाले होते.
यासंदर्भात येथील सर्व व्यावसायिकांनी खासदार राणे यांची भेट घेतली होती. यावेळी हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. पर्यटन जिल्ह्यातील सर्व परवाने सुरू झाले पाहिजेत असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे सरकारच्या लाल फितीत अडकलेले हे परवाने केवळ राणे यांच्यामुळे सुरू झाल्याने आम्ही सर्व व्यावसायिक राणेंचे आभार मानत असल्याचे शिरसाट म्हणाले.
यावेळी नगराध्यक्ष विनायक राणे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक नारकर, नगरसेवक राकेश कांदे, हॉटेल व्यावसायिक लीलाधर हडकर, गुरूप्रसाद काळसेकर, राजू आचरेकर, जयप्रकाश परूळेकर व इतर हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.सर्व परवान्यांवरील बंदी उठलीखासदार राणे यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील सर्व बंद परवान्यांवरील बंदी उठविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हॉटेल आणि पर्यटन व्यवसाय वृध्दिंगत होणार असून शासनालाही मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यात एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्यातच ही बंदी उठली आहे, असे शिरसाट यांनी सांगितले.