मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिल्यानंतर देशभरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण अभियानात मालवण पालिकेने सहभाग घेतला असून शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घेतला.
मोदी यांच्या स्वच्छ भारतच्या नाऱ्याला प्रतिसाद देताना मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनसीसी) विभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एक दिवस किल्ले सिंधुदुर्गच्या स्वच्छतेसाठी देत प्लास्टिकमुक्त किल्ला हे अभियान राबविले.प्लास्टिकच्या विळख्यातून किल्ल्याला मुक्त करण्यासाठी एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट डॉ. एम. आर. खोत यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात आले.मालवणचा ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाचा मानबिंदू आहे. किल्ले दर्शनासाठी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. एकीकडे पर्यटन वाढत असताना दुसरीकडे प्लास्टिकचा खच किल्ल्यात ठिकठिकाणी पहायला मिळत असतो. स्थानिक पातळीवरून आवाहन करूनही पर्यटकांकडून दुर्लक्ष होतो. त्यामुळे किल्ला प्लास्टिकच्या विळख्यात सापडला होता.ही बाब लक्षात घेऊन सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांनी किल्ल्याभोवती पसरलेला प्लास्टिक कचरा तसेच अन्य घनकचरा गोळा केला. यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बाटल्या सापडून आल्या.यावेळी भूगोल विभागप्रमुख डॉ. आर. एन. काटकर, वायरी सरपंच घनश्याम ढोके, उपसरपंच तुकाराम तळगावकर, विद्यार्थी प्रतिनिधी वैभव खोबरेकर, किल्लेदार हरीश गुजराथी यांच्यासह एनसीसी विभागाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. किल्ल्यावर होडी नेण्यासाठी किल्ला होडी वाहतूक संस्थेचे प्रसाद सरकारे व माजी विद्यार्थी प्रतिनिधी अमेय देसाई व हेमंत रामाडे यांचे सहकार्य लाभले.
तळाशिल येथे निवासी शिबिरराष्ट्रीय सेवा योजना (एनसीसी) विभागाच्यावतीने तळाशिल-तोंडवळी येथे एक दिवसीय निवासी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर तसेच नगरसेवक उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी एनसीसी विभागातील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत उपक्रमांचे कौतुक केले.