सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार गेली कित्येक वर्षे पारंपरिक पद्धतीने व अलीकडच्या काळात आधुनिक पद्धतीने मासेमारी करीत आहेत. पूर्वी साधी जाळी असताना सुद्धा टनावर मासळी मिळायची. आज मच्छिमारीसाठी अत्याधुनिक साधने असूनही मासळी कमी झाली आहे. त्यामागची कारणे शोधून त्यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य विष्णुदास कुबल यांनी केले.कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या पशुपालन दुग्ध आणि मत्स्य व्यवसाय विभागातर्फे येथील साई मंगल कार्यालयात महाराष्ट्राची सागरी मत्स्यसंपत्ती : निरंतर उपयोगिता, विकास आणि व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कुबल बोलत होते.
यावेळी यांत्रिक समुद्र्री अभियंता शैलेंद्रकुमार जसवाल, मत्स्य शास्त्रज्ञ अशोक कदम, वेंगुर्ले मच्छिमार सहकारी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र्र कुबल, वेंगुर्ले रापण संघाचे चेअरमन अनंत केळुसकर, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, एफ.एस.आय. मुंबईचे बी. बालनायक, फिशरीज्चे सहाय्यक कमिशनर श्रीकांत वारुंजीकर, एफ.एस.आय. मामुर्गावचे मत्स्य शास्त्रज्ञ एच. डी. प्रदीप, मच्छिमार सहकारी सोसायटीचे सचिव हितेंद्र्र रेडकर, दादा केळुसकर, मत्स्य परवाना अधिकारी सतीश खाडे आदी उपस्थित होते. यावेळी राजेंद्र्र कुबल, बालनायक, गणपत केळुसकर यांनी मनोगत व्यक्त केले. आभार एच. डी. प्रदीप यांनी मानले.आम्हांला सहकार्य करा : जसवालशैलेंद्र्रकुमार जसवाल म्हणाले, फिशरीज सर्व्हे आॅफ इंडिया नेमके काय आहे याची माहिती मच्छिमारांना देणे व मच्छिमारांच्या समस्या जाणून घेऊन त्या मत्स्य पॉलिसीमध्ये समाविष्ट करुन सोडविण्याचा प्रयत्न करणे हे भारतीय मत्स्यकी सर्वेक्षण विभागाचे काम आहे. मच्छिमार नौका पकडणे हे आमचे काम नाही. तरीही मच्छिमारांकडून गैरसमजातून आम्हाला त्रास होतो.
अलिकडेच विजयदुर्ग बंदरात आमचे सागरिका जहाज मच्छिमारांनी अडविले होते. आम्ही मच्छिमारांना सहाय्य करण्यासाठी असून केंद्रसरकारचे कर्मचारी आहोत. त्यामुळे आम्हांला सहकार्य करा. या विभागातर्फे मच्छिमारांचे आर्थिक उत्पन्न कसे वाढविता येईल व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मच्छीविक्री व्यवसाय करता येईल यादृष्टीने आपला विभाग काम करेल, असे सांगितले.