सावंतवाडी : अवैध धंद्याशी संबंधित कर्मचारीच काय, दोषी असतील तर अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही. यापुढे पोलीस ठाण्यात कलेक्टरचे काम करतील त्याची बदली नाही, तर थेट निलंबन केले जाईल. असे कलेक्टर जिल्ह्याच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात असतील, तर त्यांनी पोलीस अधीक्षकांना माहिती द्यावी. निश्चित त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी केलेल्या बदल्यांचे समर्थनही केले आहे. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, सभापती सुरेंद्र बांदेकर, आनंद नेवगी, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, बाबू कुडतरकर, शुभांगी सुकी, भारती मोरे, माधवी वाडकर, अभय पंडित आदी उपस्थित होते.सिंधुदुर्ग पोलीस दलात पोलीस अधीक्षकांनी साफसफाई मोहीम हाती घेतली आहे. तरीही यातून चुकून अवैध धंद्याशी संबंधित कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी राहिले असतील, तर त्यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश गृहखात्याने दिले आहेत.
कोणाची गय केली जाणार नाही. कायदा सर्वांना सारखा आहे. गोव्यातून मोठ्या प्रमाणात मद्य जाते. ते सिंधुदुर्गमध्ये पकडण्यात येत नाही. अन्य जिल्ह्यात पकडले जाते. अशा तक्रारी आल्या तर निश्चित त्यांची चौकशी केली जाईल. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये जर कोण कलेक्टर असतील तर त्यांच्यावर अधीक्षकांनी कारवाई केलीच आहे.पण यातून कोण सुटले असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. जनतेनेही आता पुढे येऊन अशा पोलिसांची माहिती अधीक्षकांना दिली पाहिजे, असे आवाहन मंत्री केसरकर यांनी केले आहे. यापुढे पोलीस ठाण्यात कलेक्टरचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली नाही तर थेट निलंबनच केल जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. अवैध धंद्याशी संबंधित काही पोलिसांची यादी गृहखाते मागवत असून, त्यांच्यावर शासन नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे, असेही मंत्री केसरकर म्हणाले.