सावंतवाडी : भजन व फुगडीच्या माध्यमातून स्मार्ट डिजिटल झालेल्या जिल्हा पूर्ण प्राथमिक शाळा आंबेगाव नं. १ ने यावर्षी पुन्हा एकदा आपल्या अनोख्या उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमातून प्राप्त होणाऱ्या बक्षिसांचा उपयोग करून शाळेचा रंगमंच बांधण्याचे ध्येय शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी समोर ठेवले आहे.प्रशालेने दरवर्षी विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबर आर्थिक प्रगती साधत त्याचा उपयोग शाळेकरिता केला. दरवर्षी मुले एप्रिलमध्ये परीक्षा झाल्यावर शाळेकडे पाठ फिरवितात. त्यामुळे उपकारात्मक उपक्रमाव्दारे गुणवत्ता विकास साधणे अवघड होते. मात्र ही मुले शाळेकडे पाठ न फिरविता उन्हाळी सुटी सुरू होईपर्यंत यावीत, यासाठी शिक्षक व पालकवर्गाने १ मे रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. त्याचा सराव ११ एप्रिल पासून करण्यात आला.
यामध्ये रेकॉर्ड डान्स, नकला, गायन यांच्या सरावाबरोबर दशावतारही बसविण्यात आला. राजा दक्ष या दशावतारी नाटकाचा सराव करताना शाळेत मुलांची शंभर टक्के उपस्थिती राहिली. १ मे रोजी झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून बक्षीसप्राप्त रकमेतून शाळेला ९ हजार ५०० रुपये एवढी रक्कम गोळा करता आली.हा सगळा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अस्मिता मुणनकर, स्नेहा धोंड, मंजिरी मराठे, स्नेहल जगदाळे, संजय परब या शिक्षकांसह नाना सावंत, दीपक मेस्त्री, अनिल गावडे, संतोष जाधव, संतोष राणे, अशोक शिंदे आदी ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी केशव मुळीक, दिगंबर दळवी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या बक्षिसातून प्राप्त झालेली रक्कम शाळेच्या रंगमंच उभारणीकरिता खर्च करण्याचे निश्चित करण्यात आले.