अनंत जाधव ल्ल सावंतवाडी केंद्र सरकारने प्रथमच राज्यातील तीन जिल्ह्यांना एनआरएलएच म्हणजेच राष्ट्रीय ग्रामीण जीवन उन्नती अभियानात सामावून घेतले असून यामध्ये सिंधुदुर्गचा समावेश करण्यात आला आहे, तर इतर दोन जिल्ह्यांत चंद्रपूर व बीड या दोन जिल्ह्यांचा समोवश आहे. या अभियानांतर्गत केंद्र सरकार महिला सक्षमीकरण तसेच बचत गटांना चालना देणार असून, केंद्र सरकारचा निधी थेट या तीन जिल्ह्यांना मिळणार आहे. राज्यात महिला सक्षमीकरण तसेच बचत गटांना चालना मिळावी, यासाठी गेली काही वर्षे ग्रामविकास विभाग थेट प्रयत्न करीत आहे. यासाठी महिलांचे मेळावे घेणे, बचत गटांच्या मालाला विक्री केंद्र उपलब्ध करणे असे प्रयोग जिल्हा परिषद स्तरावर राबवण्यात येत आहेत. मात्र, त्याला हवे तसे यश येत नाही. बचत गटांना अधिक चालना मिळावी, यासाठी मध्यंतरी राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे तसेच ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रीय ग्रामविकासमंत्री चौधरी वीरेंद्रसिंग यांची राज्य सरकारच्यावतीने भेट घेतली होती व त्यांना राज्यातील काही जिल्हे केंद्राच्या ‘एनआरएलएच’ म्हणजेच राष्ट्रीय ग्रामीण जीवन उन्नती अभियानात सामावून घेतली जावीत, अशी विनंती केली होती. केंद्र सरकार थेट निधी देणार केंद्रीय मंत्री सिंग यांनी राज्य सरकारच्या विनंतीला मान देऊन पहिल्या टप्प्यात राज्यातील तीन जिल्ह्यांना एनआरएलएचमध्ये सामावून घेण्याचे ठरवले असून, यामध्ये सिंधुदुर्ग, चंद्रपूर व बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील महिलांचे सक्षमीकरण करण्यात येणार असून, बचत गटांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी एनआरएलएचचे पथक या तीन जिल्ह्यांत येणार असून ते याबाबतचा प्रकल्प अहवाल तयार करतील व त्या प्रकल्प अहवालाप्रमाणे हे जिल्हे काम करणार आहेत. या तीन जिल्ह्यांना थेट केंद्र सरकार निधी देणार असून, कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणार आहे. जिल्ह्याचा समावेश करण्याबाबतचे परिपत्रक राज्याला प्राप्त झाले आहे. हे परिपत्रक या तीन जिल्ह्यांनाही पाठविण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणासाठी फायदा होणार : पालकमंत्री केसरकर राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले, केंद्र सरकारने प्रथमच राष्ट्रीय ग्रामीण जीवन उन्नती अभियानात पहिल्या टप्प्यात राज्यातील तीन जिल्ह्यांचा समावेश केला आहे. त्यात सिंधुदुर्गचा समावेश आहे. त्यामुळे या अभियानाचा महिला सक्षमीकरणासाठी मोठा फायदा होणार आहे. केंद्र सरकारचे पथक स्वत: यामध्ये लक्ष घालून काम करणार असल्याचे यावेळी मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.
‘एनआरएलएच’ अभियानात सिंधुदुर्ग
By admin | Published: November 07, 2015 10:23 PM