कणकवली : महाराष्ट्र राज्य विज मंडळ सूत्रधारी कंपनी, महानिर्मीती, महापारेषण,महावितरणमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबीत प्रश्नांसंदर्भात सोमवारी एकदिवशीय लाक्षणीक संप केला.यामुळे वीज वितरणच्या कामांवर परिणाम झाला होता.वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून हा संपकरण्यात आला. यात अधिकारी, कर्मचाऱ्याच्या संघटना सहभागी झाल्या होत्या.या कर्मचाऱ्यांनी येथील विभागीय कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर जोरदार घोषणाबाजी करत या निर्णयाचा निषेध केला.महावितरण कंपनीमध्ये असलेल्या प्रचलित शाखा कार्यालयातून वीजग्राहकांना सेवा देण्याच्या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा विचार सुरु आहे. पहिल्या टप्प्यात ठाणे, पुणे विभागात काही बदल करण्याबाबतचे आदेश पारित करण्यात आले आहेत.
महावितरण कंपनीच्या एकूण महसुलाच्या ५० टक्के पेक्षा जास्त महसुल वीज बिलाच्या अनुषंगाने येत असतो. त्यामुळेच ग्राहकांना योग्य सेवा मिळाली पाहिजे. प्रस्तावित पुनर्बांधणी आराखड्यात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत.
यात शाखा कार्यालये बंद करण्यात आलेली असून अगोदरच कमी असलेली कर्मचारी संख्या ५० टक्के पेक्षा आणखिन कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहक सेवेवर परिणाम होणार आहे. संघटनेच्या स्तरावर याबाबत काही प्रस्ताव सूचविण्यात आलेले होते. मात्र त्याचा अंतर्भाव यात करण्यात आलेला नाही.प्रस्तावित कर्मचारी आकृतीबंधच्या अनुषंगाने कामगार व अभियंते यांच्या पदांमध्ये मोठी कपात करण्यात आलेली आहे. याबाबत संघटनांनी सूचविलेले बदल न स्विकारता प्रशासनाकडून एकतर्फि आदेश करण्यात आले आहेत.
एकाबाजूला अति उच्चदाब केंद्रांची वाढती संख्या, वाहिन्यांचे वाढते जाळे सांभाळताना अभियंते व कर्मचारी मेटाकुटीस आलेले आहेत. त्यामुळे यात आणखी कपात करून कर्मचारी अधिकाऱ्यावरील ताण वाढविण्याचे काम प्रशासन करत आहे. त्यामुळे भविष्यात अनेक ग्राहकांचा विजपुरवठा अनियमित होऊन त्यांच्या रोषाला सामोरेजावे लागणार आहे.महापारेषण कंपनीत बदली धोरणाची अंमलबजावणीही एकतर्फि व संघटनाना विश्वासात न घेता करण्यात आलेली आहे. त्यानुसार अभियंत्यांच्या बदल्या करण्याची प्रक्रिया चालू आहे. अभियंत्यांच्या परिमंडळ बाहरे बदली करण्याचे धोरण आहे. त्यामुळे अभियंत्यांना २५० ते ३०० कि.मी अंतरा बाहेर जावे लागणार आहे.
व्यवस्थापकीय संचालकांनी अशा बदल्या न करण्याबाबत शब्द देऊनही त्याबाबतच चालढकल करण्यात येत आहे. महानिर्मीती कंपनीमध्येही २१० एमडब्ल्यू चे संच बंद करण्याचे धोरण तत्काळ रद्द करण्यात यावे. जोपर्यंत नविन संच उभारण्यात येत नाहीत, तोपर्यंत सध्या चालू असलेले संच बंद करू नयेत अशी मागणी आहे.महानिर्मिती कंपनीतील कार्यरत असलेल्या लघु जल विद्युत निर्मीती संचाचे अधिग्रहण न करता ही सर्व जल विद्युत निर्मीतीचे संच महानिर्मीतीच्या अंतर्गतच चालू ठेवणे महत्वाचे आहे. महानिर्मीती कंपनी 'ना नफा ना तोटा ' तत्वावर व अत्यंत कमी दरात वीजनिर्मीती करत आहे. ही सर्व लघु जल विद्युत केंद्रे चालवून महानिर्मीतीचे अभियंते कर्मचारी उद्दीष्ट पुर्ण करत आहेत.
ही लघु जल विद्युत केंद्रे पूर्ण क्षमतेने चालत असताना बीओटी तत्वावर आर अँड एम च्या नावाखाली खासगी कंपनीस चालविण्यास देणे चूकीचे आहे. या साऱ्याला विरोध म्हणून वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून हा लाक्षणीक संप करण्यात आला. यात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक वर्कर्स फेडरेशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, सबार्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशन व इतर संघटना सहभागी असल्याचे संघटनांचे प्रतिनिधी एन. ए. मोगल, ई. आर. सादये, व्ही. ए. आग्रे, आर. पी. पाटील यांनी सांगितले.