दोडामार्ग : गेल्या दोन दिवसांपासून पाळये व घोटगेवाडीत हैदोस घालणाऱ्या जंगली हत्तींना सोमवारी रात्री पाळये व घोटगेवाडी ग्रामस्थांनी जीवावर उदार होत तिलारीच्या जलाशयातून पिटाळून लावण्यात यश मिळविले. हत्तींना पिटाळण्यासाठी ढोल वाजविणारे ग्रामस्थ आणि त्यांच्या अंगावर अधूनमधून धावून जाणारा हत्तींचा कळप असा थरार सोमवारी रात्रभर सुरू होता.तिलारी खोऱ्यात गेल्या वर्षभरापासून नुकसान करणाऱ्या जंगली हत्तींचा कळप दोन दिवसांपासून घोटगेवाडी व पाळये येथे ठाण मांडून आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
वनविभाग हत्तींचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरल्याने ग्रामस्थ व शेतकरी रात्रीच्यावेळी हत्तींना पिटाळण्यासाठी गस्त घालत आहेत. सोमवारी रात्री दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर हत्तींना तिलारीच्या जलाशयातून पिटाळण्यात ग्रामस्थांना यश आले.तिलारीतून पाळये व तेथून पुढे घोटगेवाडी असा हत्तींचा नेहमीचा प्रवास असल्याने पाळयेतील ग्रामस्थ शिवराम गवस, संदेश वरक, लिंंगाजी गवस, गोपाळ पंडित, देवजी सावंत, विनायक सावंत, वैभव गवस, मायकल लोबो, वनकर्मचारी लोकरे यांनी पाळये गावाच्या सीमेवर, तर घोटगेवाडीच्या सीमेवर उपसरपंच भालचंद्र कुडव, संतोष दळवी, सिध्दार्थ चव्हाण, गुरूदास दळवी, कमलेश पर्येकर, अतुल कर्पे, परेश धुरी आदी ग्रामस्थांनी जोरजोराने ढोल वाजविण्यास सुरूवात केली.
त्यामुळे बिथरलेल्या तीन हत्तींच्या कळपाने ग्रामस्थांच्या अंगावर धावून जाण्यास सुरूवात केली. बराच वेळ हा थरार सुरू होता. अखेर शेतकरी आणि हत्ती यांच्या या संघर्षात शेतकऱ्यांचा विजय झाला. मात्र पुन्हा हत्ती या भागात परतण्याची शक्यता असल्याने हत्तीपकड मोहीम राबविण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.