सावंतवाडी : नगरपालिकेने शहरात बॅनर लावण्यावर बंदी घातली असतानाच पालिकेचे नियम सत्ताधारी शिवसेनेनेच धाब्यावर बसविल्याचे चित्र संपूर्ण सावंतवाडी शहरात आहे. सावंतवाडी नगरपालिकेत शिवसेना सत्ताधारी असल्यानेच हे नियम धाब्यावर बसविले की काय, अशा चर्चेला ऊत आला आहे.
विशेष म्हणजे या बॅनरवर नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचेही छायाचित्र आहे. तर शिवसेनेच्या पाठोपाठ स्वाभिमान पक्षानेही शहरात गणेशभक्तांच्या स्वागताची बॅनरबाजी केली आहे.नगरपालिकेने अलीकडेच गणेश उत्सवानिमित्त दक्षता समितीची बैठक घेतली. या बैठकीत सावंतवाडी शहर बॅनरने विद्रूप दिसत असल्याने शहरात बॅनर लावण्यात येऊ नयेत असा निर्णय पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी घेतला. त्यांनी त्यासाठी एक नियमावली करण्याचा निर्णय घेतला. मुख्याधिकारी जावडेकर यांची ही घोषणा होऊन अवघे पंधरा दिवस उलटत नाहीत तोच पालिकेचा नियम सत्ताधारी शिवसेनेनेच धाब्यावर बसवला आहे.
गणेश चतुर्थीनिमित्त संपूर्ण सावंतवाडी शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ही बॅनरबाजी मोती तलावाच्या काठावर म्हणजेच नगरपालिकेसमोर तसेच एसटी स्थानकाच्या बाजूला कळसुलकर यांच्या भिंतीवर असे बॅनर लावले आहेत.
या बॅनरवर मंत्री दीपक केसरकर यांच्यापासून वरिष्ठ नेत्यांची तसेच नगराध्यक्षांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. त्यामुळे शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे. ज्यांनी बंदी घातली त्यांचेच छायाचित्र बॅनरवर कसे तसेच तोच पक्ष नियम कशाप्रकारे धाब्यावर बसवतो, असा सवाल आता केला जात आहे.शहरात शिवसेनेने मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. मात्र जिल्हा बँकेने तसेच इतर एक-दोन खासगी बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेने आता कडक निर्बंध या सगळ्यांवर आणणे गरजेचे आहे. अन्यथा बोलाची कढी, बोलाचा भात असेच काहीसे शहरात होईल. त्यामुळे शहर स्वच्छतेत यातून मागे जाण्यास वेळ लागणार नाही.
नगरपालिकेने सर्वांना आवाहन केले होते. मात्र सत्ताधारी शिवसेनेने बॅनर लावले ही वस्तुस्थिती आहे. याबाबत पुन्हा एकदा मी आवाहन करेन. शहर विद्रूप होत असून अशी कृती योग्य नाही. सर्व पक्ष जर बॅनर लावत नसतील तर शिवसेनेनेही बॅनर लावू नयेत या मताचा मी आहे.- बबन साळगावकर, सावंतवाडी नगराध्यक्ष
शहरात ठिकठिकाणी बॅनर राज्यसावंतवाडी शहरात शिवसेनेच्या पाठोपाठ महाराष्ट्र स्वाभिमाननेही बॅनरबाजी केली आहे. तसेच काही खासगी ठेकेदार यांनी आपल्या इमारतीची जाहिरात केली आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी ह्यबॅनर राज्यह्णच असल्याचे जाणवत आहे.सिंधुफोटो ०२सावंतवाडी शहरात ठिकठिकाणी अशाप्रकारे बॅनर लावण्यात आले आहेत.