देवगड : उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्यावतीने दिवाळीनिमित्त आकाश कंदील स्पर्धा २०१८ चे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा लहान गट व खुला गट अशी घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन ग्रंथालयाचे उपाध्यक्ष संजय धुरी यांनी केले.यावेळी धुरी यांनी दिवाळीत बाजारात विविध तऱ्हेचे आकाश कंदील विक्रीसाठी उपलब्ध असतात. परंतु विविध प्रकारचे रंगीत कागद व बांबूच्या काड्या तसेच इतर साहित्यापासून स्वत: बनविलेला आकाश कंदील आपल्याला जास्त आनंद देतो. हस्तकलेने साकारलेले आकाश कंदील पाहताना त्यांच्यामधील अंगभूत कलेचे सौंदर्य दिसून येते.बर्वे ग्रंथालयातर्फे दरवर्षी पर्यावरणपूरक साहित्यापासून आकाश कंदील बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते. प्रत्येकाला त्याच्या अंगभूत कलेला वाव मिळावा, ती लोकांसमोर यावी यासाठी एक व्यासपीठ बर्वे ग्रंथालयाने उपलब्ध करून दिले आहे. याचा जास्तीत जास्त लाभ हौशी कलाकारांनी घ्यायला हवा, असे ते म्हणाले.ग्रंथालयाचे अध्यक्ष अॅड. अजित गोगटे यांनी ग्रंथालयाच्यावतीने अशा स्पर्धा व्यापक स्वरुपात भरविण्याचा आमचा मानस असून त्याला स्पर्धकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा आहे असे सांगून सर्व स्पर्धक आणि उपस्थित श्रोत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी ग्रंथालयाचे सचिव एस. एस. पाटील, शांताराम कर्णिक आणि या स्पर्धेचे परीक्षक सुप्रसिद्ध मूर्तिकार व चित्रकार सुहास जोशी उपस्थित होते. सुहास जोशी यांनी आकाश कंदील बनविताना कोणकोणत्या बाबी ध्यानात घ्याव्यात तसेच स्वत:ची कल्पना वापरून आकाश कंदील कसे आकर्षक बनवावेत याविषयी मार्गदर्शन केले. अॅड. गोगटे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.लहान गटामध्ये प्रथम क्रमांक ओम कुबल, द्वितीय गायित्री मेस्त्री, तृतीय निखिल तेली आणि उत्तेजनार्थ पारितोषिक सुयश चांदोस्कर व साक्षी हादगे यांना मिळाले. खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांक मंदार लाड (जामसंडे), द्वितीय हर्षल पेडणेकर (देवगड), तृतीय साक्षी पारकर (देवगड) आणि उत्तेजनार्थ सृष्टी परब (देवगड) आणि स्मिता शेवडे (जामसंडे) यांना मिळाले.आकाश कंदिलांचे प्रदर्शन स्नेहसंवर्धक मंडळाच्या सभागृहामध्ये भरविण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात आली. इतर स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालयाचे संचालक सदस्य व सांस्कृतिक विभागप्रमुख सागर कर्णिक यांनी केले आणि शेवटी आभार मानले. यावेळी विद्याधर ठाकूर, निखील जगताप, जान्हवी मोरे, रामचंद्र कुबल, व बहुसंख्येने स्पर्धक व रसिक प्रेक्षक उपस्थित होते.