सिंधुदुर्गनगरी : कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी संपूर्ण जिल्ह्यात १९ मार्च रोजीच्या मध्यरात्री राबविण्यात आलेल्या आॅल आऊट आॅपरेशनमध्ये मोटार वाहन कायद्यांतर्गत ६२ खटले दाखल करण्यात आले आहेत. तर दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या सहा जणांविरोधात खटले दाखल करण्यात आले. याचबरोबर फरारी, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींची कसून तपासणी करण्यात आली.१९ मार्च रोजी रात्री १० ते मंगळवारी पहाटे ५ वाजेपर्यंत आॅल आऊट आॅपरेशन राबविण्यात आले. या आॅपरेशनसाठी एक उपविभागीय पोलीस अधिकारी, सहा पोलीस निरीक्षक, अकरा सहाय्यक पोलीस व उपनिरीक्षक, १२६ कर्मचारी आणि ४९ होमगार्ड यांच्या सहाय्याने जिल्ह्यात २१ ठिकाणी फिक्स पॉर्इंट, दहा ठिकाणी कोंबींग आॅपरेशन आणि १९ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.
या आॅपरेशन दरम्यान तब्बल ५६७ वाहने आणि १७१५ प्रवासी यांची तपासणी करण्यात आली. यात बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या ६२ जणांवर तर दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या ६ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अजामीनपात्र वॉरंट बजावत एका आरोपीला अटक करण्यात आली. तर वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एकावर कारवाई करण्यात आली.या आॅल आऊट आॅपरेशनच्या कालावधीत जिल्ह्यातील फरारी दहा आरोपी, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे अकरा आणि २५ माहितगार गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला. जिल्ह्यातील या कारवाईबरोबरच समुद्र किनाऱ्यावरील वेंगुर्ला, मालवण, देवगड आणि रेडी सागरकिनारे तसेच बंदरजेटी यांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.कणकवलीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली हे शहर निवडणुकीसाठी नेहमीच संवेदनशील असते. यावेळी या शहराच्या नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवूू नये, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी खास काळजी घेतली आहे.