सिंधुदुर्गनगरी : निरूखे येथील रामदास करंदीकर यांच्याकडे छापे टाकणाऱ्या स्पेशल छब्बीस या बोगस अधिकारी पथकाला सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मदत केल्याचे झालेल्या चौकशीत उघड झाले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांनी या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यालयातील सायबर सेल शाखेचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार यांना निलंबित केले आहे, तर उर्वरित आठ पोलीस कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू झाली असल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे .कुडाळ येथील व्यापारी रामदास करंदीकर यांच्या निरूखे येथील निवासस्थानी केंद्रीय आयकर अधिकारी असल्याचे भासवून पोलिसांसमवेत त्या बोगस पथकाने छापे टाकून सुमारे साडेसात लाखांचा दरोडा घातला होता. हा दरोडा सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाच्या डोळ््यादेखत घातला होता.
ही घटना २२ एप्रिल रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली होती. यात करंदीकर यांना अवैध रक्कम, डिझेल व पेट्रोलचा साठा करणे या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.
बनावट अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या सहाय्याने घराची झाडाझडती घेतल्यानंतर पंचनामा करण्यासाठी पोलिसांना रोख १,८५,७१० रुपये दाखविण्यासाठी दिले. त्यानंतर पोलिसांना पुढील कारवाई करा असे सांगत तिथून उर्वरित सुमारे साडेपाच लाखांची रक्कम घेऊन पोबारा केला.यानंतर खऱ्या पोलिसांनी करंदीकर यांच्या घराबाहेरील पेट्रोल व डिझेलची कॅन व ही कॅन ठेवलेली महिंद्रा पीक अप यांचा पंचनामा करून करंदीकर यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.२३ एप्रिल रोजी करंदीकर हे जामिनावर सुटल्यावर पंचनाम्यात सुमारे साडेपाच लाख रुपये एवढी रक्कम दाखविण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे अवाक् झालेल्या करंदीकर यांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत चौकशी करण्याची मागणी केली.यानुसार पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी चौकशी केली असता हा छापा नसून बनावट अधिकारी बनून आलेल्या टोळीने पोलिसांना फसवून घातलेला दरोडा असल्याचे निष्पन्न झाले. या टोळीने करंदीकर यांना खर्चासाठी कपाटात ४४ हजार रुपये ठेवले होते हे चौकशीत निष्पन्न झाले.पोलीस अधीक्षकांकडून गंभीर दखलजिल्हा पोलीस विभागात खळबळ माजवून पोलिसांची झोप उडविली आहे. या प्रकरणात भामट्यांना सहाय्य केलेल्या पोलिसांची चौकशी झाली असून सायबर सेल शाखेचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक गेडाम यांनी निलंबन केले आहे. तर अन्य आठ जणांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे.जिल्हा पोलीस विभागाचे नाक कापणाऱ्या या घटनेची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेतली असून राज्यभर खळबळ माजवलेल्या या दरोड्यातील प्रमुख आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.