सिंधुदुर्ग : आंतरराष्ट्रीय स्कुबा डायव्हींगचे नियमन करणाऱ्या पॅडी या संस्थेच्यावतीने इसदा या संस्थेला मान्यता आहे.गेल्या तीन वर्षांमध्ये स्कुबा डायव्हींग क्षेत्रामध्ये केलेल्या कामाबद्दल म्हणजेच पर्यटकांना स्कुबा डायव्हींगचा अनुभव देणे, प्रशिक्षण देणे, स्थानिकांना प्रशिक्षण देणे, स्कुबा डायव्हींगच्या प्रशिक्षणाचा दर्जा हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील दर्जाप्रमाणे ठेवणे, सागरी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी भरीव काम करणे यासाठी विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, अशी माहिती सागर संशोधक व इसदाचे मुख्य प्रशिक्षक डॉ. सारंग कुलकर्णी यांनी दिली.पॅडी संस्थांची वार्षिक महासभा गोवा येथील प्राईड हॉटेलमध्ये शुक्रवारी पार पडली. यावेळी संस्थेचे निर्देशक रॉब कॅमल हे उपस्थित होते. या महासभेला भारतातील सर्व स्कुबा डायव्हींगचे प्रशिक्षक उपस्थित होते. इसदातर्फे मुख्य प्रशिक्षक डॉ. सारंग कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यांच्यासमवेत रुद्राक्ष आचरेकर, जितेश वस्त, नुपूर तारी, वसंत येरम, अंतोन फर्नांडिस, हर्षाली मांजरेकर, विवान राणे, विराज चोपडेकर आदी उपस्थित होते.भारतातून इसदा या एकमेव संस्थेचा सन्मानपूर्ण भारतामध्ये मालवण-तारकर्ली येथे इसदा ही सरकारतर्फे संचलित एकमेव संस्था आहे. भारतातून इसदा ही एकमेव संस्था पॅडीच्या पुरस्कारासाठी निवडण्यात आलेली आहे. भारतात सुमारे ५० संस्था स्कुबा डायव्हींगमध्ये कार्यरत आहेत.
यामध्ये अंदमान, लक्षद्विप, पाँडिचेरी, चेन्नई, गोवा, कर्नाटक, केरळ आदी राज्यांमध्ये या संस्था आहेत. यातून इसदा संस्थेने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे इसदा ही संस्था सुरू होऊन फक्त तीन वर्षे झालेली आहेत. यातून अल्पावधीतच इसदाने भारतात स्कुबा डायव्हींग क्षेत्रामध्ये मोठा मान मिळविला आहे.
या यशाचे श्रेय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला जाते. यात व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सब व्यवस्थापकीय संचालक आशितोष राठोड, साहसी क्रीडा विभागाचे व्यवस्थापक रवी पवार, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांनी नेहमीच इसदाला सहकार्य व मार्गदर्शन केले आहे. इसदाचे सर्व प्रशिक्षक व कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आज भारतात इसदाचा सन्मान झाला आहे. अशा प्रकारची संस्था सिंधुदुर्गात कार्यरत आहे, याचा मला अभिमान वाटतो.-सारंग कुलकर्णी,मुख्य प्रशिक्षक, इसदा