सिंधुदुर्ग : युवक काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, शासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 03:55 PM2018-10-23T15:55:10+5:302018-10-23T15:57:11+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत चाललेली महागाई, सरकारी रूग्णालयात डॉक्टरांची असलेली रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, महिलांवरील वाढते अत्याचार या विरोधात जिल्हा युवक काँग्रेसने आक्रमक होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधले.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत चाललेली महागाई, सरकारी रूग्णालयात डॉक्टरांची असलेली रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, महिलांवरील वाढते अत्याचार या विरोधात जिल्हा युवक काँग्रेसने आक्रमक होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधले.
विविध घोषणा देत युती सरकारचा जाहीर निषेध नोंदविला. या ज्वलंत प्रश्नांवर वेळीच तोडगा काढावा अन्यथा जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा युवक काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद लुडबे यांनी प्रशासनाला दिला आहे.
जिल्ह्यातील वाढती महागाई व यात होरपळत चाललेली सर्वसाधारण जनता यासह विविध मुद्द्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिडको बिल्डिंग ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. यावेळी विविध शासन विरोधी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. मोर्चा देवानंद लुडबे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विकास सावंत यांच्या उपस्थितीत काढण्यात आला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष भाई जेठे, महेंद्र सांगेलकर, असिम वागळे, बाळा गावडे, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, इर्शाद शेख, विभावरी सुखी, दादा परब, महिंद्र सावंत, बाळू अंधारी, ऋतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, प्रकाश डिचोलकर, अमिदी मेस्त्री, अरविंद मोंडकर, श्रीकृष्ण तळवडेकर, कौस्तुभ गावडे आदी उपस्थित होते.
मोर्चा दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शिष्टमंडळाच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, मच्छिमार व्यावसाया करिता सोसायट्यांना पुरविण्यात येणारा डिझेल परतावा शासनाकडे प्रलंबित आहे.याचा भुर्दंड मच्छिमार बांधवांनी का सहन करावा ? यातील त्रुटी दूर करून सरकारने भरपाई करावी.
गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहेत ते कमी करावेत. सिंधुदुर्ग जिल्हा सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत. आॅपरेशन होत नाहीत. औषध उपलब्ध होत नाहीत परिणामी येथील काही कर्मचारी औषधोपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयात जाण्यास सांगतात.
जिल्ह्यात बलात्कार,चोऱ्या यासह इतर गुन्हेगारी वाढत चालली आहे. यावर प्रशासनाचा अंकुश नसल्याचे स्पष्ट होते. भ्रष्टाचारी अधिका-यां विरोधात पुरावे देवूनसुद्धा कारवाई होत नाही. त्यामुळे या सर्व मुद्द्यांवर गांर्भीयाने विचार होवून तोडगा काढावा अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल.