सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या अभियंता संवर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटनेने १९ व २० मार्च या दोन दिवसांचे सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अभियंत्यांनी सोमवारी सामूहिक रजा आंदोलन छेडत जिल्हा परिषद भवनासमोर धरणे आंदोलन छेडले.जिल्हा परिषद अभियंत्यांनी १९ व २० मार्च या दोन दिवसांचे सामूहिक रजा आंदोलन सुरू केले असून सोमवारी जिल्हा परिषद भवनासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा पाटील, शेखर आदष्णवार, अनिल तांबे, इंद्रजित मांडेकर यांच्यासह अभियंते यावेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषद अभियंत्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी गेली सहा वर्षे शासनाशी चर्चा सुरू आहे. प्रत्येक चर्चेवेळी सकारात्मक चर्चा होऊन मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे राज्यभरातील जिल्हा परिषद अभियंत्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ मार्च रोजी राज्यातील सर्व म्हणजे ३२०० जिल्हा परिषद अभियंत्यांनी काळ्या फिती लावून काम केले होते. याकडेही शासनाने लक्ष न दिल्याने या कर्मचाऱ्यांनी १९ व २० मार्च या दोन दिवसांचे सामूहिक रजा आंदोलन छेडले आहे. या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील ४५ अभियंता सहभागी झाले आहेत. हे सामूहिक रजा आंदोलन छेडत असतानाच या अभियंत्यांनी सोमवारी जिल्हा परिषद भवनासमोर धरणे आंदोलन छेडले.