लोकमत न्यूज नेटवर्ककणकवली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राफेलबाबतची केंद्र सरकारची भूमिका योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजेच देशाचा चौकीदार प्रामाणिक आहे. पण चुकीची माहिती देऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देशाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप भाजपच्या राज्य मीडिया सेलच्या प्रमुख व प्रदेश प्रवक्ता श्वेता शालिनी यांनी येथे केला.राफेल कराराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही काँग्रेसकडून भाजपवर चिखलफेक सुरू आहे. राफेल व्यवहाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांची बाजू मांडण्यासाठी श्वेता शालिनी या मंगळवारी सिंधुदुर्गात आल्या होत्या. त्यांनी कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली, अतुल रावराणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत, प्रभाकर सावंत, संदेश सावंत- पटेल, प्रज्ञा ढवण, गीतांजली कामत आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी श्वेता शालिनी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर कडाडून टीका केली. यूपीएच्या काळात राफेलचा व्यवहार सुरू झाला होता. पण बोफोर्स हा ज्यांचा इतिहास आहे. ती काँग्रेस या व्यवहारात 10 वर्षे दलालांकडून किती दलाली मिळते त्याची वाट पाहत राहिली. त्यांच्यासाठी देशाची सुरक्षितता महत्त्वाची नव्हती. मात्र, आम्ही देशाच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. त्यामुळेच आमचे सरकार आल्यावर यात कोणताही बदल न करता राफेल खरेदीसाठी पुढाकार घेतला. फक्त यातून दलालांना बाजूला करण्यात आले. भारत आणि फ्रान्स सरकारने एकमेकांशी थेट व्यवहार केले. हीच गोष्ट काँग्रेस आणि राहुल गांधी यांना खटकत आहे. म्हणून ते आमच्यावर आरोप करीत आहेत, असे सांगत श्वेता शालिनी म्हणाल्या की, न्यायमूर्ती दीपक मिश्रा प्रकारणांमध्ये ज्या न्यायाधीशांची बाजू काँग्रेसने घेतली होती त्याच न्यायाधीशांनी जेव्हा राफेलबाबत केंद्र सरकारला क्लीन चिट दिली तेव्हा राहुल गांधींना तेच न्यायमूर्ती चुकीचे कसे काय वाटू शकतात असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.केंद्र सरकारला देशाची सुरक्षितता महत्वाची वाटते, त्यामुळे राफेल संदर्भात महत्वाच्या गोपनीय गोष्टी खुल्या न करता हा व्यवहार पारदर्शी झाल्याचे त्यांनी सांगितले. परंतु या व्यवहारावर संशय व्यक्त करून काँग्रेस देशवासीयांचा, वायु सेनेचा अपमान करत आहे मात्र देशाची जनता हुशार आहे, ती योग्य निर्णय घेईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.देशात विकासकामे संथ होत आहेत मात्र ती बंद नाहीत. देशाचे शासन बदलले आहे. पण प्रशासन गेली 60 वर्षे तेच आहे .त्याचा हा परिणाम आहे . पण पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात सकारात्मक बदल घडवतील आणि 2019 मध्ये पुन्हा भाजपची सत्ता येईल.असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग : राफेल प्रकरणी काँग्रेसकडून दिशाभूल : श्वेता शालिनी यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 4:01 PM
लोकमत न्यूज नेटवर्क कणकवली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राफेलबाबतची केंद्र सरकारची भूमिका योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र ...
ठळक मुद्देराफेल प्रकरणी काँग्रेसकडून दिशाभूल सिंधुदुर्गात श्वेता शालिनी यांचा आरोप