कुडाळ : मराठा समाजाने मागचा इतिहास सांगत न बसता वर्तमानातील नावीन्यपूर्ण बदल स्वीकारून स्पर्धेत टिकणारी व अन्यायाविरोधात आवाज उठविणारी नवीन पिढी घडवावी, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राज्य सरचिटणीस राजेंद्र्र कोंढरे यांनी येथे आयोजित कुडाळ तालुका मराठा समाज कर्मचारी बांधवांच्या स्नेहमेळाव्यात केले. शासकीय सेवेतील मराठा समाजाच्या कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरोधात संघटित होऊन आवाज उठविण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने मराठा समाजातील शासकीय सेवेतील कर्मचारी बांधव-भगिनींचा स्नेहमेळावा येथील मराठा समाज सभागृहात आयोजित केला होता. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत, प्रा. अविनाश ताकवले, सूर्यकांत वारंग, धीरज परब, दादा साईल, रेखा राऊळ, वासुदेव नाईक आदी उपस्थित होते.यावेळी कोंढरे म्हणाले, कोपर्डी घटनेनंतर मराठा समाजबांधव एकत्र झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तसेच इतर मागण्यांसाठी विविध आंदोलने सुरू आहेत. समाजाला आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. समाजातील शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या समस्या तसेच शासकीय सेवेत समाजाला यापुढे निर्माण होणारे प्रश्न व समस्यांविरोधात आवाज उठविण्यासाठी संघटित होण्याची गरज आहे. संघटन, ताकद, बुद्धी, तंत्रज्ञान, विज्ञान या सर्व गोष्टींचा वापर करून आपण या विरोधात आवाज उठविला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने न्याय मिळेल.आज जो समाज संघटित होऊन आणि वस्तुस्थिती स्वीकारून नावीन्यपूर्ण शिक्षण घेत आहे, तो समाज सक्षम ठरत आहे. त्यामुळे आपणही याचा स्वीकार केला पाहिजे, असेही कोंढरे म्हणाले. मराठा समाजातील शासकीय सेवेतील कर्मचारी बांधवांना कोणताही त्रास होऊ नये तसेच शासन निर्णयाचा चुकीच्या पद्धतीने वापर होऊ नये, यासाठी शासनस्तरावर खुला प्रवर्ग कक्षाची स्थापना होण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मराठा समाजातील प्रश्न आणि शासन निर्णयांवर अभ्यास करण्यासाठी समाजाचा निवृत्त कक्ष स्थापन केला पाहिजे, असे कोंढरे यांनी सांगितले.शासन यंत्रणेत बिंदू नामावली पदोन्नती प्रक्रियेत घोळ आहे. त्यामुळे शासकीय सेवेत काम करणाऱ्या समाज बांधवांना अनेक प्रश्न व समस्यांना सामोरे जावे लागत असून, काहीजण त्यांना नाहक त्रास देत आहेत. या विरोधात जागृत होऊन लढले पाहिजे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपल्या मुलांना नावीन्यपूर्ण शिक्षण दिले पाहिजे. एमपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षा प्रणाली लक्षात घेतली पाहिजे. प्रशासकीय साक्षरतेचे ज्ञान आत्मसात करा. वेगवेगळ््या उपक्रमांमध्ये सहभाग घ्या, आर्थिक सक्षम बना, असे आवाहन कोंढरे यांनी केले. आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाचे बरेच विद्यार्थी गुणवत्ता असूनही उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे आरक्षण मिळण्यासाठी व आपल्या समाजातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी लढत राहणार असल्याचे दादा साईल यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील मराठा समाजातील शासकीय कर्मचारी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम सावंत यांनी केले.संघटित होऊन लढा देणार : सुहास सावंतआता तलवारीची भाषा करून उपयोग नाही. आपण लोकशाही स्वीकारली आहे. त्यामुळे आपली लढाई संघटित होऊन ताकद व बुद्धीचा वापर करूनच लढली पाहिजे, असे अॅड. सुहास सावंत यांनी सांगितले. जिल्ह्यातील शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या मराठा समाज बांधवांवर अन्याय झाल्यास संघटित होऊन लढा देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. मराठा समाज आरक्षणाचा निर्णय होईल. मात्र आरक्षण देताना इतर कोणत्याच आरक्षित समाजावर अन्याय होता नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच घटनात्मक व चौकटीत टिकणारेच आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाज आग्रही आहे. तरच आरक्षणाचा उपयोग होणार आहे, असे राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग : अन्यायाविरोधात नवीन पिढी घडवा : राजेंद्र कोंढरे, मराठा समाज कर्मचारी बांधवांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 5:07 PM
मराठा समाजाने मागचा इतिहास सांगत न बसता वर्तमानातील नावीन्यपूर्ण बदल स्वीकारून स्पर्धेत टिकणारी व अन्यायाविरोधात आवाज उठविणारी नवीन पिढी घडवावी, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राज्य सरचिटणीस राजेंद्र्र कोंढरे यांनी येथे आयोजित कुडाळ तालुका मराठा समाज कर्मचारी बांधवांच्या स्नेहमेळाव्यात केले.
ठळक मुद्दे अन्यायाविरोधात नवीन पिढी घडवा : राजेंद्र कोंढरे कुडाळ तालुका मराठा समाज कर्मचारी बांधवांच्या मेळाव्यात प्रतिपादन