कणकवली : गेली १५ वर्षे काँग्रेसच्या माध्यमातून नारायण राणे सत्तेत होते. त्यावेळी शिवस्मारक सिंधुदुर्ग किल्ल्यावर व्हावे, असा विचारही त्यांनी मांडला नाही. पालकमंत्री असताना ही मागणी सरकारकडे करण्याची गरज होती. मात्र, आता आमदार नीतेश राणे यांनी शिवस्मारकाची मागणी केली आहे.
यापूर्वी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनीदेखील आमदार असताना ही मागणी केली होती. सध्या नारायण राणेही भाजपाचे खासदार असल्याने सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्मारक होण्यासाठी त्यांनी जिल्हावासीयांचे नेतृत्व करावे. मनसे या मागणीला पाठिंबा देईल. नाहीतर केवळ निवडणुकीच्या तोंडावर शिवाजी महाराजांबद्दल बेगडी प्रेम कोणीही दाखवू नये, असा टोला मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.कणकवलीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, मनविसे जिल्हा संपर्कप्रमुख शैलेश श्रुंगारे, गौरव राणे, शहराध्यक्ष शैलेश नेरकर, मनविसे उपाध्यक्ष अनिल राणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी उपरकर म्हणाले, शिवस्मारकाच्या मुद्यावर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गेली अनेक वर्षे राजकारण केले जात आहे. शिवस्मारक समुद्रात बांधण्यापेक्षा शिवाजी महाराजांनी त्या काळात उभारलेले गड-किल्ले जतन करून त्या ठिकाणी स्मारके उभारण्याची खरी गरज असल्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मांडली आहे़. केवळ कोट्यवधी रुपये खर्च करून दिखावूपणाचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे.जगातील एकमेव शिवराजेश्वर मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. त्या किल्ल्याच्या कामाचे भूमिपूजन स्वत: शिवाजी महाराज यांनी केले होते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक ऐतिहासिक ठेवा महाराजांनी दिला आहे. निवडणुका आल्या की शिवस्मारकाचे प्रेम विविध पक्षातील नेत्यांना उफाळून येते़.
काँग्रेस सत्तेत असताना याबाबत सातत्याने मी मागणी केली होती़. तर प्रमोद जठार यांनीदेखील शिवस्मारक सिंधुदुर्ग किल्ल्यावर न झाल्यास न्यायालयात जाण्याची घोषणा केली होती़. मग, प्रमोद जठार आता थंड का? सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन खरोखरच स्मारक सिंधुदुर्गात होण्याची मागणी केली पाहिजे, असेही उपरकर यावेळी म्हणाले.फसव्या घोषणा करून दिशाभूल करू नये!निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक इव्हेंट म्हणून भूमिपूजनाचा कार्यक्रम केला जातो. हे केवळ शिवाजी महाराजांबद्दल नेत्यांचे बेगडी प्रेम आहे. शिवाजी महाराजांनी अनेक गड-किल्ले उभारले. त्या गड-किल्ल्यांवरून विरोधकांना चारीमुंड्या चित केले. अशी ऐतिहासिक आठवण असलेले गडकिल्ले जतन करण्याची गरज आहे. स्मारके उभारण्यापेक्षा सरकारने गडकिल्ल्यांची डागडुजी करण्यासाठी निधीची तरतूद करावी. केवळ फसव्या घोषणा करून सरकारने दिशाभूल करू नये, असा इशारा परशुराम उपरकर यांनी यावेळी दिला.