सिंधुदुर्ग : वायरी येथील युवकाने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी शहरानजीक गावातील पीडित युवतीने पोलिसांत धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पर्यटन व्यावसायिक असलेल्या संशयित केदार मिलिंद झाड याच्यावर बलात्कार, मारहाण तसेच भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याबाबतची तक्रार पीडित तरुणीने शनिवारी रात्री दिली.दरम्यान, मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर संशयिताला बेड्या ठोकण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी पोलीस पाठविले होते. मात्र तो सापडून आला नाही. केदार हा सिंगापूरला गेल्याचे सांगण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. पीडित युवतीच्या तक्रारीनंतर मालवणात एकच खळबळ उडाली. कारण, संशयित केदार हा विवाहित असल्याची माहिती समोर आली आहे.पीडित युवतीची केदारशी २०१६ साली ओळख झाली. त्यानंतर काही महिन्यांत ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. मैत्रीत प्रेमाच्या आणाभाका सुरू असताना केदार याने मैत्रीचा फायदा उठवित ११ एप्रिल २०१७ रोजी तिच्या खोलीवर पहिल्यांदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याचे त्या तरूणीशी सातत्याने शारीरिक संबंध सुरू होते.
केदारने त्यानंतर तिला विमान सफर घडवित १४ एप्रिल २०१७ रोजी तो तिला दिल्ली, कुलूमनाली येथे फिरण्यास घेऊन गेला. तेथेही त्याने तिच्याशी सातत्याने शारीरिक संबंध ठेवले असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले.केदार हा आपल्याशी लग्न करणार असेच त्या युवतीला वाटत होते. त्यामुळे ४ जून २०१७ रोजी केदार याने त्या युवतीला एका मंदिरात नेऊन कुंकू लावून, मंगळसूत्र घालून तिच्याशी लग्न केले. त्यावेळी त्याचे मित्रही उपस्थित होते, असे तक्रारीत म्हटले आहे.४ रोजी लग्न झाल्यानंतर त्याने १६ जूनला केरळ येथे हनिमूनला नेत शरीरसंबंध ठेवले. तेथून आल्यानंतर काही दिवस सर्व सुरळीत चालले असताना एप्रिल २०१८ पासून केदार त्या युवतीशी बोलायचे टाळू लागला. त्याचकाळात त्याचे अन्य एका मुलीशी प्रेमसंबंध जुळल्याची माहिती पीडित युवतीला मिळाली. त्यावेळी त्यांच्यात वाद झाल्याने केदारने तिलामारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली.पीडित युवतीने शनिवारी सायंकाळी उशिरा पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संशयित आरोपीवर तक्रारीनुसार रात्री उशिरा लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, मारहाण तसेच भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील करीत आहेत.
केदारने दुसऱ्याच तरुणीशी केले लग्नकेदार हा तेथीलच एका तरुणीशी विवाहबद्ध झाल्याची माहिती पीडित युवतीला मिळाली असता ती प्रचंड मानसिक तणावात होती. काही वेळा तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. याबाबत तिने केदार याच्याशी संपर्क साधला असता त्याने माझे काय ते करून घे अशी धमकी दिली. त्यानंतर पीडित युवतीने न्यायासाठी आपल्या कुटुंबीयांसह कौटुंबीक सल्ला केंद्रातही धाव घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी तिला आधार दिला होता.