- सुधीर राणे
कणकवली - गेल्या आठ वर्षात मोदी सरकारने देशभरात जेवढ्या जनकल्याणाच्या योजना राबवल्या तेवढ्या योजना गेल्या ६७ वर्षात कोणतेही सरकार राबवू शकलेले नाही. महाराष्ट्रातही पुन्हा भाजपचे सरकार आलेले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या योजना अधिक जोमाने सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संघटितपणे काम करा. पक्षासाठी असलेली निष्ठा आणि आत्मीयतेने सुरू असलेले येथील काम पाहिल्यानंतर सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपचाच खासदार निवडून येणार असल्याचा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी व्यक्त केला.
कणकवली येथे भाजपा लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत गुरुवारी आयोजित कणकवली विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे , भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली , जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,लोकसभा संयोजक अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत , विधानसभा संयोजक मनोज रावराणे , विधानसभा सहाय्यक संयोजक संदीप साटम , महिला जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे , नगराध्यक्ष समीर नलावडे , वैभववाडी नगराध्यक्ष नेहा माईणकर , कणकवली विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी ,माजी जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य , नगरसेवक , सरपंच , उपसरपंच , सदस्य आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. केंद्र सरकारच्या योजनेतील जनतेला अपेक्षित असलेले बदल आणि कारणे जाणून घेतली. लाभार्थ्यापर्यंत केंद्र शासनाच्या योजना अजून व्यापक स्वरूपात पोहोचाव्यात म्हणून काय केले जावे? याबाबतचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर ते बोलत होते.
ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणातील अनेक प्रश्न केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून आमदार नितेश राणे व भाजपचे पदाधिकारी केंद्र सरकारकडे मांडत आहेत. आपण कार्यकर्ते म्हणून काम करत असताना पक्षाच्या योजना तळमळीने मांडता हे पाहून समाधान वाटते. २०१४ च्या पूर्वी देशात अनेक सरकारे होती. मात्र सामान्य जनतेच्या गरजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणल्या. यशस्वी पंतप्रधानांच्या यशस्वी योजनांची चर्चा कार्यकर्ते म्हणून जनतेपर्यंत पोहचवा आणि नवनव्या योजनांचे लाभ जनतेला मिळवून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी भाजपा आमदार नितेश राणे यांनी चर्चेदरम्यान पदाधिकारी आणि केंद्रीय गृहमंत्री मिश्रा यांच्यात समन्वय साधला.आमदार राणे यांनी केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचा भगवी शाल, सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला.इतर मान्यवरानीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.