देवगड : लोकांचा विरोध असेल, प्रकल्पात बागायती जात असतील, लोकवस्ती असेल तर हा रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही. त्यासाठी विरोध करणाऱ्या स्थानिकांसोबत आपण शेवटपर्यंत राहू असे प्रतिपादन खासदार हुसेन दलवाई यांनी गिर्ये येथील भेटी दरम्यान स्पष्ट केले.
राजापूर प्रकल्पबाधित गावांतील शेतकऱ्याच्या भेटीनंतर देवगडमधील गिर्ये-रामेश्वर गावातील लोकांच्या भेटीसाठी व प्रकल्पबाधित क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी दलवाई यांच्या नेतृत्वाखाली काँंग्रेसचे शिष्टमंडळ आले होते.गिर्ये येथील श्री चौदेश्वर देवी मंदिरात आपले म्हणणे मांडण्यासाठी मोठ्या संख्येने गिर्ये-रामेश्वर गावातील शेतकरी एकत्र आले होते. दोन्ही संघर्ष समितीच्यावतीने यावेळी आपले म्हणणे मांडण्यात आले.
यावेळी शिष्टमंडळासोबत विधान परिषद सदस्या हुस्नबानू खलिफे, काँग्रेस प्रवक्ते हरिष रोग्ये, डॉ.भालचंद्र मुणगेकर, अविनाश लाड, रमेश कीर, विश्वनाथ पाटील, मधू चव्हाण, विकास सावंत, राजन भोसले, कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम आदी उपस्थित होते. तसेच उल्हास मणचेकर, आरिफ बगदादी, गिर्ये सरपंच रुपेश गिरकर, रामेश्वर सरपंच विनोद सुके, रामेश्वर संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश केळकर, गिर्ये संघर्ष समिती अध्यक्ष मुनाफ ठाकुर आदी उपस्थित होते.काँग्रेस सरकारच्या काळात लोकांच्या विरोधाला किंमत होती. परंतु, भाजप सरकारला लोकांबद्दल आत्मियताच नाही. अमेरिकेच्या धर्तीवर इकडे मांडणी करण्याचा घाट प्रधानमंत्र्यांचा असून हुकूमशाहीकडे लोकशाही वळविण्याचा प्रयत्न आहे.
ठाणे-सावंतवाडीपर्यंतच्या सर्व एम.आय.डी.सी. या कोकणचा विनाश करणाऱ्या आहेत. कोकणातील लोक सहन करणारे असल्याने इतर सर्वजण त्याचा फायदा घेतात. पण हेच देशावर घडले तर तेथील लोक सोलून काढतील. प्रकल्पात बागायती जात असेल, लोकवस्ती असेल तर असे प्रकल्प करण्याला आमचा विरोध कायम आहे.ओसाड जमिनीवर हे प्रकल्प नेण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आम्ही शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढू, वेळप्रसंगी लाठी खाऊ असे विचार खासदार दलवाई यांनी व्यक्त केले.