कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पंढरपूर माघ वारीस मोठ्याप्रमाणात वारकरी एसटीने जातात, मात्र, एसटी विभागाकडून योग्य सहकार्य मिळत नाही. आपल्या मागण्यासाठी वारकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलनेही केली आहेत.
यावर्षी पंढरपूर माघ वारी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडयात येत असून यावेळी एस.टी.ने चांगली सुविधा पूरवावी. यासह अन्य मागण्यांचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने एस.टी.चे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांना दिले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ. प. विश्वनाथ गवंडळकर,सचिव राजू राणे, ह.भ.प. भालचंद्र पवार, अनंत घाडीगांवकर, प्रभाकर राणे, भाऊ गावकर, राजू पाताडे, गणपत घाडीगांवकर, चंद्रकांत परब तसेच अन्य वारकरी उपस्थित होते.यावेळी विभाग नियंत्रकांकडे करण्यात आलेल्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत. एका एस टी च्या गाडीमध्ये २५ ते ३० जेष्ठ वारकऱ्यांना आरक्षण देण्यात यावे.वारकऱ्यांच्या लहान मुलांनाही आरक्षण देण्यात यावे.
वारीसाठी देण्यात येणाऱ्या एसटीच्या गाड्या सुस्थितीत व स्वच्छ मिळाव्यात, तसेच वारकरी ८ दिवसाच्या मुक्कामास जात असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात धान्य, कपडे, भांडीकुंडी, जाळण्यासाठी लाकडे न्यावी लागतात. त्यासाठी बुकिंग होणाऱ्या सर्व गाड्या कॅरिअर च्या असाव्यात. बुकिंग केलेल्या गाड्या नियोजित वेळेतच मिळाव्यात. पंढरपूर माघ वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्याना एस टी च्या दिवस रात्र भाड्यात सवलत मिळावी.कर्मचाऱ्यांना वारकाऱ्यांशी सहकार्याने वागण्याच्या सूचना द्याव्यात२७ जानेवारीस आंगणेवाडी यात्रा असल्याने त्यासाठी गाडयांचे नियोजन केले जाते. त्याचा कोणत्याही प्रकारे त्रास माघावारीस जाणाऱ्या वारकऱ्यांना होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.यावेळी विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी मागण्यांचा योग्य विचार केला जाईल व वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये. याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन वारकऱ्यांच्या शिष्टमंडळास दिले.