देवगड : देवगड एसटी आगारातील गळक्या गाड्यांची दुरुस्ती करण्यात आली असून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आगाराला भेट देत गाड्यांची पाहणी केली. त्यामुळे मनसेने एसटी आगाराविरोधात पुकारलेले आंदोलन स्थगित केले असल्याची माहिती तालुकाध्यक्ष मयूर मुणगेकर यांनी दिली. देवगड येथून शिवशाही बसेस सुरू करण्याचा प्रस्ताव कार्यवाहीसाठी कणकवली विभाग नियंत्रकांकडे पाठविण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.देवगड एसटी आगारातील गळक्या गाड्यांची दुरुस्ती तत्काळ करा, अन्यथा १७ जुलै रोजी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेच्यावतीने आगार व्यवस्थापकांना देण्यात आला होता. तसेच शिवशाही बसेस देवगडमधून सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत देवगड आगार व्यवस्थापकांनी या आगारातील गळक्या गाड्यांची दुरुस्ती केल्याची माहिती मयूर मुणगेकर यांना दिली.मुणगेकर यांच्यासह माजी तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, सचिव जगदीश जाधव, पडेल विभागीय अध्यक्ष जगन्नाथ पडेलकर, उपतालुकाध्यक्ष अमित घाडी, मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष तुषार गावकर, सचिन राणे, अभिजीत तेली, प्रकाश वारीक यांनी एसटी आगारात जाऊन गाड्यांची पाहणी केली.
यावेळी आठ गाड्यांचे बोस्टींग तर पाच गाड्यांची पॅच टचिंग, पत्रे रिपेअरिंग, पत्रे फिटींग, सेंटर बेअरिंग बदली, टायर व्हिलर टचिंग आदी कामे करण्यात आल्याचे आगार व्यवस्थापकांनी सांगितले. या कामांबाबत मनसेकडून देवगड आगार व्यवस्थापकांचे आभार व्यक्त करण्यात आले.