सिंधुदुर्गनगरी : दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या नरडवे महंमदवाडी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या पावसाळ्यापूर्वी सोडवा अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दक्षिण कोकण पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजन डवरी यांच्याकडे केली आहे.
प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त, सोनवडे तर्फ कळसुली दुर्गनगर ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार करूनही त्या सुटलेल्या नाहीत. याबाबत सोनवडे ग्रामपंचायतीने लेखी पत्रव्यवहार केला. तरीही याकडे दुर्लक्ष केला जात आहे. त्यामुळे या समस्या पावसाळ्यापूर्वी सोडवाव्यात अशी मागणी सतीश सावंत यांनी केली आहे.याबाबतचे निवेदन कार्यकारी अभियंता राजन डवरी यांना देण्यात आले आहे. यावेळी सतीश सावंत यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण मडव, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष मडव, सरपंच अर्चना मडव, उत्तम बांदेकर, संघर्ष समितीचे संजय पवार, भाई बोभाटे, निलेश पवार, नारायण गावडे, गुणवंत सावंत, अनिल परब, सचिन तेली, गणेश बुटाले, जनार्दन गुरव यांसह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.या निवेदनात म्हटले आहे, सोनवडे तर्फ कळसुली दुर्गनगर येथील ग्रामस्थांच्या नागरी सुविधांबाबत आपल्याकडे जिल्हा परिषद सदस्य या नात्याने बैठका, चर्चा याद्वारे वेळोवेळी समस्या मांडल्या. ग्रामपंचायतीचे निवेदन दिले.
यावेळी अधीक्षक अभियंता डवरी व उपअभियंता रणखांबे यांच्याशी सरपंचांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार एकही नागरी सुविधा देण्यात आलेली नाही. परिणामी येथील नागरिकांना भीषण पाणीटंचाई व वीज समस्या यांचा सामना करावा लागत आहे.
ग्रामसभेच्या ठरावाची प्रत देण्यात आलेली असताना त्याचीही दखल घेतली नाही. आंबडपाल कार्यकारी अभियंता यांनाही भेटून चर्चा करण्यात आली. तरीही सुविधांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे सोमवारी पुन्हा एकदा सतीश सावंत आणि नरडवे महंमदवाडी धरण प्रकल्पग्रस्तांनी दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता यांची भेट घेत निवेदन सादर केले.
प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्या सोनवडे तर्फ दुर्गनगर पवारवाडी ते लाडवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करावे, नरडवे मुख्य रस्ता (जुना स्टँड) ते नरडवे केटी बंधारा क्र. १ मार्गे सोनवडे मुख्य रस्ता खडीकरण व डांबरीकरण करावा, पुनर्वसन गावठण ते मठ-पणदूर-कुडाळ-जांभवडे रस्ता खडीकरण डांबरीकरण करावा, दिगवळे-कुपवडे केटी बंधारा ते कुपवडे मुख्य रस्ता खडीकरण डांबरीकरण करावा, नरडवे महंमदवाडी मध्यम पाटबंधारे डावा कालवा मंजूर करून सोनवडे, घाडीगाव, घोडगे, भरणी गावे ओलिताखाली आणावीत, विद्युत समस्या मार्गी लावावी, पुनर्वसन, स्वेच्छा पुनर्वसन, घर, वने यांचे थेट खरेदीद्वारे मानधन जमा करावे, पिण्याच्या पाण्याची सोय करावी, नरडवे महंमदवाडी प्रकल्पातील बाधित घरे, जमिनी संपादित कराव्यात.