सिंधुुदुर्ग : अनाथ, निराधार, अंध-अपंग व दारिद्र्यरेषेखाली असहाय्य जीवन जगणाऱ्या घटकांना शासन पातळीवर न्याय मिळावा या मागणीसाठी जिल्ह्यातील अपंग बांधवांचा आक्रोश मोर्चा माजी नगरसेवक सुनील पेडणेकर व प्रहार अपंग क्रांतीच्या जिल्हाध्यक्षा श्रद्धा आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी येथील प्रांत कार्यालयावर धडकला.यावेळी महालक्ष्मी अंध-अपंग सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना सादर केले. दरम्यान, अपंगांनी केलेल्या मागण्यांबाबत लवकरच वरिष्ठांचे लक्ष वेधणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.महाराष्ट्र शासनाच्या बदलत्या धोरणामुळे अनाथ, अपंग, निराधार व दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या घटकांना जीवन जगणे मुश्किल झाले असून त्यांच्या प्रश्नांकडे कोणीच लक्ष देणारा नसल्याने शहरातील माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी महालक्ष्मी अंध-अपंग संघटनेच्यावतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते.
तत्पूर्वी या मोर्चेकरांना शहरातील आदिनारायण मंगल कार्यालयात आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या प्रहार अपंग क्रांतीच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा श्रद्धा आंबेकर व पेडणेकर यांनी मार्गदर्शन केले. या मोर्चात मोठ्या संख्येने अंध-अपंग निराधार बांधव सहभागी झाले होते.यावेळी पोलिसांनी मोर्चेकरांना थांबवित पाच ते सहा जणांच्या शिष्टमंडळाला प्रांताधिकाऱ्यांच्या भेटीसाठी पाठविण्यात आले. प्रांताधिकारी खांडेकर यांनी अपंगांच्या मागण्या शासन स्तरावरच्या असल्याने आपण वरिष्ठांपर्यंत त्या पोहोचविण्याचे काम करतो, असे सांगितले.
याशिवाय पालिकेने केलेल्या अपंगांच्या स्टॉलवर केलेल्या कारवाईबाबत आपण मुख्याधिकाऱ्यांशी बोलून तोडगा काढण्याबाबत सूचना देतो, असे सांगितले. यावेळी तहसीलदार सतीश कदम, पोलीस निरीक्षक सुनील धनावडे उपस्थित होते.