मालवण : राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविक-शेतकऱ्यांना प्रत्येक स्टॉलवर सुलभरित्या प्रदर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी प्रदर्शन जागेची पाहणी केली. यावेळी कृषी प्रदर्शन व्यवस्थापक संदीप गिड्डे यांना प्रदर्शनास शेतकऱ्यांना त्रुटी अथवा समस्या जाणवू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना चौधरी यांनी केल्या.आंगणेवाडी यात्रोत्सवादरम्यान पाच दिवसीय भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आढावा घेतला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष नरेश आंगणे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, जिल्हा कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके, तालुका कृषी अधिकारी, पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांसह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी महनीय व्यक्तींसाठी उभारण्यात आलेल्या हेलिपॅडची पाहणी केली. तर आंगणेवाडीतील पावसाळ्यात कोसळलेली विहीर बांधून पूर्ण झाली. या विहिरीचीही पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी योग्यप्रकारे पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल. मंडळाच्या सूचना विचारात घेतल्या जातील, असे स्पष्ट केले.