कुणकेश्वर : कुणकेश्वर-चांदेलवाडी येथे डंपर चालक आनंद दत्ताराम ठाकूर यांनी भरधाव वेगाने व निष्काळजीपणामुळे डंपर चालवून समोरुन येणाऱ्या रिक्षाला धडक दिली.
या अपघातामध्ये रिक्षाचालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात हा सोमवारी सकाळी ११ वाजता घडला. भरधाव वेगाने डंपर चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.आनंद दत्ताराम ठाकूर (३१) हे आपल्या ताब्यातील (एम.एच.०७ वाय २३४४) हा डंपर घेऊन कातवणवरुन कुणकेश्वरमार्गे किंजवडेच्या दिशेने जात असताना कुणकेश्वर-चांदेलवाडी येथील कुणकेश्वरवरुन मुणगेच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षेला धडक दिल्याने रिक्षाचालक अनिकेत गणपत गावडे (३०,रा. इळये) व त्यामध्ये असलेले प्रवासी प्रतिक्षा प्रविण कुडाळकर (३५, रा.इळये), प्रदिप पांडुरंग रुपये (३२, रा.इळये-वरंडवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत.
रिक्षाचालक अनिकेत गावडे याला उपचारासाठी कणकवली येथे आणि कुडाळकर व रुपये यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथे हलविण्यात आले आहे. अपघातामध्ये रिक्षाचे सुमारे ८0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अधिक तपास देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजन पाटील करीत आहेत.डंपर चालकावर गुन्हासदर अपघाताची माहिती देवगड पोलीस ठाण्यामध्ये अमोल रुपये यांनी दिली आहे. यावरुन पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत भरधाव वेगाने डंपर चालवून समोरुन रिक्षाचालकासह प्रवाशांच्या दुखापतीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी डंपर चालक आनंद ठाकूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.