वैभववाडी : कुसूर पिंपळवाडी येथील विलास पांडुरंग पाष्टे या प्राथमिक शिक्षकाच्या बँक खात्यातून अज्ञाताने २ लाख ४९ हजार सातशे पंच्याऐंशी रुपये परस्पर हडप केले आहेत.कर्जाचा धनादेश स्टेट बँकेच्या खात्यात जमा झाला का? याबाबत खात्री करण्यासाठी पाष्टे येथील शाखेत गेले असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला. अज्ञाताने पाष्टे यांना एटीएम आणि ओटीपी क्रमांक विचारुन सलग पाच दिवसात गंडा घातला आहे. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.विलास पाष्टे नाधवडे सरदारवाडी शाळेत शिक्षक असून जिल्हा बँकेच्या नाधवडे शाखेतून त्यांनी पाच लाखांचे कर्ज काढले आहे. त्यापैकी २ लाख ३५ हजार रुपयांचा धनादेश त्यांनी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या वैभववाडी शाखेतील बचत खात्यात १५ जुलैला जमा केला होता.
१६ जुलैला सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास पाष्टे यांना मोबाईलवर अज्ञाताने संपर्क साधून मी स्टेट बँक आॅफ इंडियाचा मॅनेजर बोलतोय असे सांगितले. तसेच तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे. तुमचे एटीएम जुने आहे. ते चालू करण्यासाठी तुम्हांला आधार कार्ड व पॅन कार्ड बँकेत जमा करावे लागेल असे सांगितले.
तोपर्यंत मी तुम्हांला तुमचे एटीएम चालू करुन देतो असे सांगत त्यांच्या एटीएमचा १९ अंकी क्रमांक विचारुन मोबाईलवर आलेला ओटीपी विचारला. त्यानंतर १६ जुलैला स्टेट बँकेच्या बचत खात्यातून ४९ हजार नऊशे सत्यान्नव रुपये परस्पर काढले. त्यानंतर शुक्रवारपर्यंत दरदिवशी ४९ हजार नऊशे सत्यान्नव रुपये कमी होत गेले.
ही बाब शुक्रवारी पाष्टे कर्जाचा धनादेश जमा झाला का पाहण्यासाठी बँकेत गेले असता लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तत्काळ एटीएम कार्ड बंद करुन पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला केला आहे.
दरम्यान आधारक्रमांक व पॅन कार्ड लिंक करण्याचे सांगून एटीएम क्रमांक मिळविला जातो. त्याद्वारे बँक खात्यातून रक्कम हडपण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून फसवणूक टाळावी. याबाबत बँकानीही आपल्या ग्राहकांची जनजागृती करावी, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी केले आहे.