आचरा : आचरा-भंडारवाडी येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याने भंडारवाडी शाळा बंद करु नये अशी ग्रामस्थ व पालकांची भूमिका असतानाही शासन निर्णयामुळे आचरा भंडारवाडी शाळा बंद होणार आहे.
आचरा भंडारवाडीत शाळेत आलेल्या गटशिक्षण अधिकारी दत्तात्रय मुळीक यांची ग्रामस्थांनी भेट घेत आपला विरोध दर्शविला. मात्र शासन निर्णयामुळे पटसंख्या कमी असल्याने शाळेतील मुलांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.आचरा भंडारवाडी प्राथमिक शाळेची पटसंख्या कमी असल्याने शाळा बंद करुन शाळेतील मुले नजीकच्या गाऊडवाडी शाळेत दाखल केली जातील अशी माहिती पालकांना देण्यात आली होती. त्यानंतर आचरा- भंडारवाडी बौद्धवाडीतील पालकांनी शाळा बंद करण्यास विरोध करत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले होते.
शुक्रवारी भंडारवाडी शाळेत केंद्रप्रमुखांसह मालवण गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मुळीक, दाखल झाल्याची माहिती मिळताच आचरा भंडारवाडी बौद्धवाडीतील पालकांनी गटशिक्षणाधिकाºयांची भेट घेतली.
यावेळी लक्ष्मण आचरेकर, बाळू आचरेकर, स्नेहा कांबळी, प्रभाकर आचरेकर, बाबाजी आचरेकर, जनार्दन आचरेकर, अन्य ग्रामस्थ, पालकांसह शिक्षिका नंदिता सुर्वे व मनिषा शिंदे या हजर होत्या.यावेळी आलेल्या पालकांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना शाळा बंद न करण्याची वारंवार विनंती केली. शाळेत प्रवेश घेऊ पाहणाऱ्या एका विद्यार्थ्याला तर प्रवेश नाकारण्याचे प्रकार या शाळेत झाले आहेत. या शाळेतल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांची गरजच राहिलेली नाही. म्हणूनच शाळा बंद होण्याची वेळ आली आहे.
असा आरोप करताच या शाळेच्या शिक्षिका सुर्वे यांनी ग्रामस्थांच्या म्हणण्याला विरोध करत आम्ही मुले शाळेत येण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केलेत. मात्र पालकच आम्हाला साथ देत नाहीत. शाळेच्या कोणत्याही बैठकीला हजर राहत नाहीत. उलट आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करत आहेत. असे सांगताच पालक व शिक्षिका यांच्यात खडाजंगी झाली.शिक्षकच शाळा बंदा पाडावयाच्या मार्गावर आहे. यावर काय कारवाई करणार असा प्रश्न गटशिक्षणाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी केला. गटशिक्षणाधिकारी मुळीक यांनी ही बाब गंभीर असून शाळा व्यवस्थापनाने नावासहीत आपल्याकडे ठराव पाठवावा. त्यावर नक्कीच कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले.गटशिक्षणाधिकाऱ्यांना जाब विचारलाजोपर्यंत शाळेची पटसंख्या ११ ते १५ होत नाही. तोपर्यंत शाळा बंद राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भंडारवाडी शाळेतील शिक्षिका व पालक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक होऊन आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. यावेळी प्राथमिक शिक्षकच दुसऱ्या वाडीतील शाळांमधील मुले आपल्या शाळेत पळवत असल्याचा गंभीर प्रकार पालकांनी कथन करत यावर कारवाई होणार काय असा प्रश्न गटशिक्षण अधिकारी यांना विचारला.