मालवण : वारंवार मागणी करूनही शाळेतील रिक्त शिक्षकांची पदे न भरणा केल्याने संतप्त बनलेल्या मालोंड शाळा नंबर एक मधील सर्व मुलांना पालकांनी पंचायत समितीत बसवत अनोखे आंदोलन छेडले. शाळेतील सर्व मुले शाळा बंद करून पंचायत समितीत आणण्याच्या या प्रकाराने शिक्षण विभागात खळबळ उडाली.दरम्यान, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी पालक व गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मुळीक यांची बैठक बोलवत समस्या जाणून घेतल्या. अखेर शाळेवर या संपूर्ण वर्षासाठी शिक्षक नेमणूक देण्यात आली. शिक्षकही तातडीने शाळेवर रवाना झाल्याने पालकांनी छेडलेले आंदोलन मागे घेतले.यावेळी सरपंच वैशाली घाडीगांवकर, पोलीस पाटील पांडुरंग तांडेल, सुहास सुर्वे, मकरंद तांडेल, रवींद्र तांडेल, महेश परब, औदुंबर तांडेल, नवनाथ घाडीगांवकर, पुर्वा फणसगावकर, जयवंत पारकर, पद्माकर फणसगावकर, गौरी परब, प्रणाली परब, सुलतान शेख, सुवर्णा मालंडकर आदी व इतर ग्रामस्थ तसेच विद्यार्थी उपस्थित होते. स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, उपसभापती अशोक बागवे, शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे यांनीही पालकांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला.मालोंड एक नंबर शाळेत सातवी इयत्तेपर्यंत वर्ग असून सध्या २५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. निकषाचा विचार करता सहावी ते आठवी या वर्गासाठी पदवीधर शिक्षक अपेक्षित आहेत. मात्र तालुक्यात ११२ शिक्षक पदे रिक्त असल्याने शाळेत शिक्षक संख्या कमी आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत होत आहे.मालोंड शाळेत एकही पदवीधर शिक्षक नसल्याने पालक आक्रमक बनले. अखेर विस्तार अधिकारी यांच्या अधिकारात शाळेवर शिक्षक नेमणूक देण्यात आल्याने पालकांनी आंदोलन स्थगित केले.वैभव नाईक यांनी सचिवांची घेतली भेटसिंधुदुर्ग जिल्ह्यात चार हजार साठ शिक्षक पदे मंजूर आहेत. मात्र सध्या तीन हजार चारशे सहासष्ठ शिक्षक कार्यरत आहेत. सहाशे शिक्षक पदे रिक्त आहेत. त्यात २३५ शिक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदली झाल्या. त्यातील ६५ शिक्षकांना सोडण्यात आले. तर केवळ ६ शिक्षक जिल्ह्याबाहेरून आले.
शेकडो शिक्षक पदे रिक्त असल्याने शिक्षणावर याचा परिमाण होतो. तरी बदली झालेल्या शिक्षकांना सोडण्यात येऊ नये अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी मंत्रालयात शासन सचिवांकडे केली आहे. शासन सचिवांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली.