कुडाळ : डिझेल आणि पेट्रोल यांचा अवैध साठा केल्याप्रकरणी निरूखे येथील माजी सरपंच रामदास पुरूषोत्तम करंदीकर (५५) यांच्यावर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने कारवाई करून त्यांना अटक केली. या कारवाईत ४४ हजार रुपयांचे पेट्रोल व डिझेल तसेच १ लाख ८५ हजार रुपयांची रोख रक्कम व कार मिळून ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वाचक शाखेतील पोलीस कर्मचारी जयेश सरमळकर यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली.रविवारी सरमळकर हे ड्युटीवर गेले असताना त्यांना करंदीकर यांच्याकडे अवैध व विनापरवाना डिझेल, पेट्रोल साठा असल्याची माहिती मिळाली. त्यांनी याची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आलेल्या पथकाने रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास करंदीकर यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी त्यांच्याकडे सुमारे ४० हजार २०० रुपयांचे ६०० लीटर डिझेल, ४१८० रुपयांचे ५० लीटर पेट्रोल तसेच १,८५,७१० रुपयांची रोख रक्कम मिळून आली.
या मुद्देमालासह पोलिसांनी पाच लाख रुपये किमतीची कारही जप्त केली. करंदीकर यांच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली.