बांदा : बऱ्याच महिन्यांच्या कालावधीनंतर बांदा पोलीस तपासणी नाक्यावर बेकायदा दारू वाहतुकीविरोधात कारवाई केली आहे. गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तेलंगणा राज्यातील पर्यटकांविरोधात ही कारवाई करण्यात आली. १ लाख ३ हजार रुपयांच्या दारूसह तब्बल सात लाखांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला.बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बसचा चालक सुधाकर सायना डी (४३, राहणार तेलंगणा), सुरेश रामराव सनकीनैनी (४०), राजू इलैया रागम, (४०) यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल आशिष लावंघरे, धनंजय नाईक, ए. डी. टिळेकर यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास केली.बांदा पोलीस तपासणी नाक्यावर बुधवारी गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्वच वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती.बुधवारी सायंकाळी ४ च्या सुमारास गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणारी लक्झरी बस (टीएस.०७, युए.०७८०) तपासणीसाठी थांबविण्यात आली. तपासणी दरम्यान, बसमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा गोवा बनावटीचा दारूसाठा आढळून आला.
गोवा बनावटीच्या विविध अकरा प्रकारच्या उंची दारूचा साठा सापडला. १ लाख २ हजार ६५५ रुपयांच्या दारूसह सहा लाख रुपये किंमतीची लक्झरी बसही ताब्यात घेण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दारू कारवाईत लक्झरी बस ताब्यात घेण्यात आली.