कणकवली : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई येथील पदाधिकारी मेळाव्यात कोकणात संघटनात्मक बांधणीत लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गणेशोत्सवाच्या काळात गावागावात शाखा सुुरु करण्याच्या सुचना केल्या आहेत. त्या पार्श्वभुमीवर मुंबई व सिंधुुदुर्गातील पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मेळावा १५ सप्टेंबरला कुडाळ येथे होणार आहे. अशी माहीती मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर उपस्थित होते. या मेळाव्यात माझ्यासह मनसे नेते शिरीष सावंत हे मार्गदर्शन करणार आहेत. २०१९ मधील निवडणुकांमध्ये मनसे सर्व ताकदीनिशी लढणार आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार या मेळाव्यात संघटनात्मक बांधणीचे नियोजन करण्यात येईल असे परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.ते पुढे म्हणाले, या पदाधिकारी मेळाव्यात उपाध्यक्ष प्रवीण मर्गज, सत्यवान दळवी, राजा चौगुले, वाहतुक सेना अध्यक्ष संजय नाईक, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, महिला विभाग अध्यक्ष, महिला पदाधिकारी व मनसैनिक सहभागी होणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यात एकत्रित सिंधुदुर्ग व मुंबई स्थित पदाधिकाऱ्यांचा संवाद होणार आहे.
प्रत्येक पदाधिकाऱ्यांने आपल्या गावात शाखा सुरु करावी. मनसेच्या संघटनात्मक बांधणीसाठी गावागावात बैठका घ्याव्यात. त्याचा अहवाल विभाग अध्यक्षांमार्फत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना सादर केला जाणार आहे. खऱ्या अर्थाने कोकणातुन मनसेला ताकद खेड नगरपंचायतच्या विजयाने मिळाली होती. त्याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीत मनसेची सत्ता आणण्यासाठी कोकणातुन आमदार निवडुन आले पाहीजेत. त्यासाठीच कोकणात संघटनात्मक बांधणी करा, अशा सुचना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्या होत्या. या पार्श्वभुमीवर कुडाळ येथील मेळाव्यात चर्चा करुन नियोजन केले जाणार असल्याचे परशुराम उपरकर यांनी सांगितले.आतापर्यंतच्या विविध राजकीय पक्षांनी कोकणचा कायापायट करु, कोकणचा कॅलीफोर्निया करु असे सांगुन कोकण भकास करण्याचा प्रयत्न चालविला आहे. नको असलेले प्रदुषणकारी प्रकल्प आणुन कोकणातील कोकणपण नष्ट करण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. कोकणचा विकास हा कोकणपण नष्ट न करता झाला पाहीजे.
कोकणच्या विकासाची ब्ल्यु प्रिंट राज ठाकरे यांच्याकडे तयार आहे. त्यामुळे मनसैनिकांनी पुढील १५ दिवसात आपआपल्या गावात नव्या जोमाने शाखा निर्माण कराव्यात. स्थानिक पदाधिकाऱ्यांना ताकद द्यावी. यासाठीच हा कुडाळ येथे पदाधिकारी मेळावा होईल, असे परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.विमान उड्डाणापेक्षा महागाई कमी करा!चिपी विमानतळावर विमान उतरवुन जिल्ह्याला अनोखी भेट दिल्याचे केंद्रीय उड्डाणमंत्री सुरेश प्रभु, पालकमंत्री दीपक केसरकर सांगत सुटले आहेत. तर दुसरीकडे या विमान उड्डाणामुळे कोकणी माणसाच्या जीवनात महागाईचे विघ्न दुर होणार नाही. डिझेल, पेट्रोल आणि वाढती महागाई कमी करुन जनतेला दिलासा देण्याची गरज आहे.
या महागाईच्या दृष्ट चक्रात अडकलेल्या जनतेचे लक्ष विक्रेंद्रीत करण्याचे काम सेना-भाजपचे नेते करत आहेत. विमान उड्डाणामुळे जनतेला लागलेली महागाईची झळ आणि ग्रामीण भागामध्ये असलेले खड्डेमय रस्ते याचा विसर जनतेला पडणार नाही. त्यामुळे विमान उड्डाणापेक्षा सत्ताधाऱ्यांनी महागाई कमी करावी असा टोला माजी आमदार परशुराम उपरकर यांनी यावेळी लगावला.