सिंधुदुर्ग : पॅनकार्ड क्लब कंपनीच्या बांधित गुंतवणूकदारांच्या प्रतिनिधींचा राज्यव्यापी मेळावा पुण्यात पार पडला. या मेळाव्यात ९ आॅक्टोबर रोजी आझाद मैदान येथे सर्वपित्री अमावस्येच्या निमित्ताने सरकारचे श्राद्ध करण्याची घोषणा सार्वमताने करण्यात आली. या सरकारचे श्राद्ध घालण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा अशी घोषणा संघटने प्रमुख ज्ञानेश्वर दारवटकर यांनी केली.यावेळी सभागृहात सरकारविरोधी प्रचंड घोषणाबाजी झाली. जनता त्रस्त झाली असून त्याचे परिणाम सरकारला येत्या निवडणूकीत मोजावे लागतील असा इशारा इन्वेस्टर्स वेल्फेअर फोरमचे अध्यक्ष नंदकुमार गावडे यांनी दिला.देशभरात ५५ लाख गुंतवणूकदार व त्यापैकी ३५ लाख गुंतवणूकदार पॅनकार्ड क्लब कंपनीच्या सेबीच्या कारवाईमुळे बाधित झाले आहेत. दोन वर्षापासून राष्ट्रशक्ती संघटनेच्या प्रयत्नातून राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळाने ३१ डिसेंबर २०१७ रोजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनाही साकडे घातले होते. मात्र या प्रयत्नांना अद्याप यश मिळालेले नाही.यावेळी गायकवाड, कोरले, तांबोळी, धामणकर, जाधव व वैद्य यांनी आपले मनोगत मांडले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी जितकर, खाटपे, जावळकर, हांचाटे, पवार हे उपस्थित होते. यावेळी इन्वेस्टर्स वेल्फेअर फोरमचे सचिव मुगुटराव मोरे यांनी सूत्रसंचालन केले. फोरमचे अध्यक्ष नंदकुमार गावडे यांनी आभार मानले. मेळाव्यास नगर, औरंगाबाद, भुसावळ, जळगाव, नाशिक, धुळे, कोल्हापूर, सांगली, सातारा, विटा, बेळगाव, गडहिंग्लज, सिंधुदुर्ग, गोवा व मुंबई येथून मोठ्या प्रमाणावर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.गुंतवणूकदारांचे संसार उघड्यावरराज्यातील सुमारे ३८ खासदारांच्या घरावर गुंतवणूकदारांनी संघटनेच्या माध्यमातून घंटानाद आंदोलन केले आहे. राज्य सरकारच्यावतीने मुख्यमंत्र्यांनी या विषयाचा केंद्राकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी या विषयावर कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही.
पॅनकार्ड क्लब कंपनीच्या मिळकतीचा ९ वेळा लिलाव झाला असून या मिळकती विकत घेण्यासाठी ग्राहक मिळत नाहीत. ही कारणे वेळोवेळी सांगितली जात आहेत. मात्र, राज्यातील ३५ लाख गुंतवणूकदारांच्या वेदना समजून घेण्यात सरकारला रस नाही. दोन वर्षे आंदोलन करुनही निर्णायक तोडगा निघत नाही. या स्थितीत गुंतवणूकदारांचे संसार उघड्यावर आले आहेत.