सिंधुुदुर्ग : कणकवली तालुक्यातील नांदगाववासीयांचा रक्षणकर्ता आणि नवसाला पावणारा, हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या श्री देव कोळंबा देवाच्या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी उसळली. सायंकाळी भाकरीच्या महाप्रसादासाठी तर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.यात्रोत्सवानिमित्त नवस बोलणे व नवस फेडणे तसेच या यात्रेचे वेगळेपण असणाऱ्या भाकरीच्या प्रसादासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. जिल्हाभरासह राज्याच्या अनेक भागातून आलेल्या असंख्य भाविकांनी श्री देव कोळंबाचे दर्शन घेतले.रविवारी सकाळी मानकरी ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री देव कोळंबाची विधिवत पूजाअर्चा झाल्यानंतर या यात्रोत्सवास प्रारंभ झाला. यात्रोत्सवासाठी भाविकांचे पहाटेपासूनच आगमन होत होते. सकाळच्या सुमारास यात्रा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
भाविकांनी सूर्योदयापासून श्री देव कोळंबाच्या दर्शनासाठी रांग लावली होती. दुपारच्या वाढत्या उन्हाबरोबरच गर्दी वाढू लागल्याने दर्शनाची रांगही वाढली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी वाढतच होती. दरम्यान, सकाळी यात्रोत्सवास विधिवत प्रारंभ झाल्यानंतर नवस फेडण्याच्या कार्यक्रम सुरू झाला.सकाळच्या सत्रात दर्शनासाठी लांबच लांब रांगा दिसत होत्या. दुपारी उशिरापर्यंत भाविकांनी दर्शन घेतले. यानंतर नवीन नवस बोलण्याचा कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावर्षी कोळंबा यात्रेसाठी जिल्ह्यातील भक्तांबरोबरच मुंबईकर चाकरमान्यांनी गर्दी केली होती.
यात्रोत्सवास येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय जाणवू नये यासाठी श्री देव कोळंबा देवस्थानचे अध्यक्ष नागेश मोरये व नांदगाव ग्रामस्थांनी योग्यप्रकारे नियोजन केले होते.