सिंधुदुर्गनगरी : दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद राज्यात प्रथम आल्याबद्दल मध्यप्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारून जिल्ह्यात दाखल झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत आणि पदाधिकाऱ्यांची ओरोस फाटा ते जिल्हा परिषद भवन अशी ढोलपथकांच्या गजरात वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
ही मिरवणूक जिल्हा परिषद भवनासमोर आल्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी रेश्मा सावंत यांना पुष्पगुच्छ देऊन या रॅलीचे स्वागत केले.केंद्रशासनाच्या पंचायत राज मंत्रालयामार्फत दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण अभियान राबविण्यात आले होते.
या अभियानात देशातील सर्व जिल्हा परिषदा व ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. या अभियानात जिल्हा परिषदेचा कारभार, जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्यां नावीन्यपूर्ण योजना, लोकाभिमुख प्रशासन, विकासात्मक व दर्जेदार कामांसह पारदर्शक कारभार हे या अभियानासाठी निकष होते.या निकषाप्रमाणे केंद्रीय तपासणी समितीमार्फत ३० आॅक्टोबर २०१७ रोजी प्रथम तपासणी करण्यात आली. त्यानंतर १४ फेब्रुवारी २०१८ रोजी अंतिम तपासणी करण्यात आली. त्यानंतर केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने या अभियानाचा निकाल जाहीर केला होता.या अभियानात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने सर्व निकषांची पूर्तता करून राज्यपातळीवर बाजी मारली होती. प्रत्येक राज्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने या अभियानात प्रथम क्रमांक प्राप्त केला होता.यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०१८ देण्यात आला. हा पुरस्कार जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी स्वीकारला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, कोळोशी ग्रामसेवक अर्चना लाड आदी उपस्थित होते.हा पुरस्कार घेऊन जिल्ह्यात दाखल झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षा व जिल्हा परिषद प्रशासनाचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच ओरोस फाटा येथील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ओरोस फाटा ते जिल्हा परिषद भवन अशी या पुरस्काराची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई, वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, महिला व बालविकास सभापती सायली सावंत, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सदस्या संपदा देसाई, श्वेता कोरगावकर, पल्लवी झिमाळ, महेंद्र्र चव्हाण, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर, आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.पुरस्काररुपी ५0 लाखांचे बक्षीसदीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण अभियानात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद राज्यात प्रथम आल्याने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला पुरस्कार मिळाला असून पुरस्काररुपी ५० लाखांचे बक्षीसही मिळाले आहे.